लखनऊ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी निश्चित होताच, उत्तर प्रदेशमधील एक गाव जबरौलीमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना रिपब्लिकनच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सामना करावा लागणार आहे. मात्र, हिलरी क्लिंटन यांच्या विजयाने उत्तर प्रदेशमधील या गावांत जल्लोषाचे वातावरण का आहे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.


 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने हिलरींना उमेदवारी निश्चित होताच, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून मात्र २० किलोमीटर अंतरावर असलेल्या जबरौलीमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. हिलरी क्लिंटन आणि तिचे पती बिल क्लिंटन यांच्या फोटोंना पेढा भरवून संपूर्ण गावात मिठाई वाटप करण्यात आले.

 

पण या घटनेने जबरौल गावाचे क्लिंटन यांच्याशी काय संबंध आहेत, हा प्रश्न अनेकांना पडला. तर वास्तविक याचे मुळ १७ जुलै २०१४ मध्ये आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर आले असता, त्यांनी उत्तर प्रदेशमधील जबरौल या छोट्याशा गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जवळपास अडीच तास ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला.



विशेष म्हणजे, क्लिंटन यांनी यावेळी त्यांच्या फाऊंडेशनच्या आरोग्य मोहीमे अंतर्गत जबरौल गाव दत्तक घेतले. त्यानंतर या गावात आरोग्य मोहीम प्रभावीपणे राबवली गेल्याने हे गाव निरोगी बनले. पण, इतर समस्या तशाच आहेत. पण आता हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांच्या विजयाने या गावाचे चित्र पालटेल ही आशा जबरौलच्या ग्रामस्थांना आहे.

 

जबरौल हे गाव उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर असूनही या गावातील अद्याप मुलभूत समस्यांचे निराकरण झाले नाही. या गावाला बिल क्लिंटन भेट देणार म्हणून, या गावात स्वच्छतेसोबतच तात्पूर्त्या स्वरुपातील सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र क्लिंटन यांच्या मायदेशी परतण्यानंतर गावांतील समस्यांनी पुन्हा डोके वर काढले. पण आता हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरल्याने जबरौलमधील ग्रामस्थ विकासाची स्वप्ने पाहात आहेत.