केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्यूरो (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो - एनसीआरबी)ने 2016 सालातील जारी केलेली आकडेवारी जाहीर केली.
2016 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक (9.5 टक्के) गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश (8.9 टक्के), महाराष्ट्र (8.8 टक्के) आणि केरळ (8.7 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या, तर अपहरणाच्या आणि लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
48 लाख 31 हजार 515 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद गेल्या वर्षी झाली. त्यामध्ये 29 लाख 75 हजार 711 गुन्हे हे आयपीसी अंतर्गत तर 18 लाख 55 हजार 804 गुन्हे हे विशेष आणि स्थानिक कायद्यांअंतर्गत येतात. 2015 च्या तुलनेत (47 लाख 10 हजार 676 गुन्हे) यामध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, उत्तर प्रदेशात 50 टक्के गुन्हेगारांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रातील Rate of Conviction अवघा 11 टक्के आहे.
हत्येच्या गुन्ह्यांमध्ये घट
2015 च्या तुलनेत देशात हत्यांच्या घटनांमध्ये 5.2 टक्क्यांनी घट झाली आहे. 2016 मध्ये 30 हजार 450 हत्यांचे गुन्हे नोंदवण्यात आले. दंगल (5 टक्के) आणि दरोडे (11.8 टक्के) या केसेसमध्येही गतवर्षीच्या तुलनेत घट आहे. मात्र अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये 6 टक्क्यांनी वाढ आहे.
महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 2.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये पती किंवा सासरच्या मंडळींनी केलेला छळ (32.6 टक्के), विनयभंग (25 टक्के), महिलांचं अपहरण (19 टक्के) आणि बलात्कार (11.5 टक्के) यांचा समावेश आहे.
बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसरा
2015 मध्ये बलात्काराच्या 34 हजार 651 गुन्ह्यांची नोंद झाली होती. ते 2016 मध्ये 12.4 टक्क्यांनी वाढून 38 हजार 947 वर पोहचले आहेत. बलात्काराच्या घटनांमध्ये मध्य प्रदेश (4 हजार 882 केसेस - 12. 5 टक्के) अव्वल असून दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश ( 4 हजार 816 केसेस - 12.4 टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र ( 4 हजार 189 केसेस - 10.7 टक्के) आहे.
लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांमध्येही उत्तर प्रदेश अव्वल आहे. महाराष्ट्र दुसऱ्या, तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अपहरणाच्या केसेसमध्येही उत्तर प्रदेश दबंग आहे. देशातील 54 हजार 723 घटनांपैकी 7 हजार 956 अपहरणाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. इथेही महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
2016 मध्ये अनुसूचित जाती किंवा जमातींतील नागरिकांविरोधातील अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 5.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
40 हजार 801 केसेसमध्ये उत्तर प्रदेश (20 हजार 426 केसेस - 25.6 टक्के) अव्वल असून त्यानंतर बिहार (5 हजार 701 केसेस - 14 टक्के) आणि राजस्थान ( 5 हजार 134 केसेस - 12.6 टक्के) यांचा क्रमांक लागतो.
इतर ठळक मुद्दे :
सायबर गुन्हेगारीमध्येही 2015 च्या तुलनेत 6.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
15 कोटी 92 लाख 50 हजार 181 रुपये किमतीच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक (2 कोटी 37 लाख 24 हजार 50 रुपये) खोट्या नोटा ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.
मेट्रो शहरांची आकडेवारी पाहता, दिल्लीमध्ये सर्वाधिक (38.8 टक्के) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर बंगळुरु (8.9 टक्के) आणि मुंबई (7.7 टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो.
अपहरणाच्या केसेसमध्ये दिल्ली (5 हजार 453), तर मुंबई (1 हजार 876 ) दुसऱ्या स्थानी आहे.
कोठडीत झालेल्या 60 मृत्यूंपैकी 12 महाराष्ट्रात झाले आहेत.
एकूण 3 लाख 50 हजार 862 किलो वजनाचे विविध प्रकारचे ड्रग्ज 2016 मध्ये जप्त करण्यात आले.