Prayagraj Violence : उत्तर प्रदेशमधी प्रयागराज येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी योगी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी जावेद पंप याच्या घरावर बुलडोझरची कारवाई सुरू झाली आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जावेद पंप याचा आलिशान बंगला बुलडोझरने जमीनदोस्त केला जाणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. तत्पूर्वी जावेदच्या घरावर नोटीस चिकटवून आज सकाळी 11 वाजता बुलडोझर कारवाईची माहिती देण्यात आली.
10 जून रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात जावेद अहमदचे नाव समोर आले आहे. प्रयागराज हिंसाचार प्रकरणात जावेद पंपसोबत त्याची पत्नी आणि मुलगी यांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी जावेद पंपवर करण्यात आलेली कारवाई ही यापूर्वी दिलेल्या नोटीसच्या आधारे करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत घर रिकामे करण्याचे आदेश पीडीए अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र, दुपारी 12.45 वाजता पोलीस आणि प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात बुलडोझरची कारवाई सुरू झाली.
पोलिसांनी जावेद पंप याचे घर रिकामे केले असून यावेळी सुरक्षा उपकरणांसह पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रयागराज येथील जेके आशियाना कॉलनीत जावेद पंप याचा बंगला आहे. पोलीस आशियाना कॉलनीतील रस्त्यावरून फ्लॅग मार्च काढत आहेत. यासोबतच सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी घराच्या आवारातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
प्रयागराज हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. "दंगलखोरांवर कडक कारवाई करावी. हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून वसूल करण्यात यावी. योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनंतर आज जावेद पंप याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले आहेत.