Presidential Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 15 जून रोजी बैठक बोलावली आहे. ममता बॅनर्जी यांनी या बैठकीचे आमंत्रण भाजपविरोधी पक्षांना दिले आहे. मात्र, या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. या बैठकीत शिवसेनेकडून कोण सहभागी होणार, याबाबतही काहीच स्पष्ट झाले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते या बैठकीत सहभागी होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली बैठक ही एकतर्फी असल्याची चर्चा सुरू आहे. बैठकीचा दिवस ठरवण्याआधी ममता यांनी चर्चा न करता पत्र पाठवले असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीस जाणार नाहीत. तर, दुसरीकडे 15 जून रोजी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह इतर नेतेही या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतदेखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाहीत.
विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी शिवसेना असणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधकांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सुरुंग लागला असल्याची चर्चा सुरू आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधकांची 15 जून रोजी बैठक बोलावली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली ही बैठक एकतर्फी असल्याचे इतर पक्षांनी म्हटले. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे व इतर पक्षांनी याआधीच 15 जून रोजी बैठक घेण्याचे निश्चित केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीवर इतर पक्ष नाराज आहेत. इतर वरिष्ठ नेत्यांना डावलून स्वत: ला भाजपविरोधी आघाडीचा चेहरा असल्याचे दाखवण्याचा ममता यांचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकीच्या तारखेबाबत झालेल्या चर्चेचा भाग नव्हत्या. तरीदेखील त्यांना बैठकीची माहिती कशी मिळाली, याबाबत काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.