UP Minister Dinesh Khatik Resigns : अनुसूचित जातीमधील असल्यानेच मंत्री असूनही योग्य सन्मान होत नसल्याचे सांगत उत्तर प्रदेश सरकारमधील जलशक्ति खात्याचे राज्यमंत्री दिनेश खटीक यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये सगळं आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे.
राज्यमंत्री दिनेश खटीक यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनला पाठवला आहे. दिनेश खटीक यांनी सांगितले की, अनुसूचित जातीमधील असल्यााने त्यांच्या खात्यात कोणतीच सुनावणी होत नाही. इतकंच काय, त्यांना कोणत्याही बैठकीची माहिती दिली जात नाही. राज्यमंत्री म्हणून एक कार दिली आहे. मात्र, खात्यातील निर्णयाबाबत काहीच अधिकार दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. खटीक यांनी बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे.
बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली. मात्र, ही माहिती सादर केली नसल्याचे खटीक यांनी म्हटले. सिंचन खात्याच्या सचिवांवर त्यांनी आरोप केले. सिंचन सचिवांनी पूर्ण म्हणणं न ऐकता दूरध्वनी मध्ये ठेवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 'नमामि गंगा'मध्ये देखील भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात राज्यमंत्री दिनेश खटीक यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. या पत्राची एक प्रत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनला पाठवण्यात आली आहे. मात्र, सरकार अथवा पक्षाच्या स्तरावर याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खटीक यांनी आपल्या पत्रात म्हटले की, अनुसूचित जातीमधील असल्यानेच विभागात कोणत्याच कामाची जबाबदारी सोपवण्यात आली नाही. त्याशिवाय, दिलेल्या आदेशाचे ही पालन होत नसल्याचे ही त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेश सरकारमधील अधिकारी मागासवर्गीयांचा सातत्याने अपमान करत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. माझ्या अखत्यारीत असलेल्या विभागातून चुकीच्या पद्धतीने पैसे उकळण्यात आले. याची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी म्हटले.