उत्तर प्रदेश: अलिगडमधील टप्पल पीएस भागात काल रात्री उशिरा ट्रक आणि व्होल्वो बस यांच्यात भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. बस दिल्लीहून आझमगडच्या दिशेने जात होती, याबाबतची माहिती समोर आली आहे.
अलीगढमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर काल(बुधवारी) रात्री ट्रक आणि बसमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर 15 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे. यमुना एक्सप्रेस वेवर खासगी बसची ट्रकला धडक बसली. खासगी बस दिल्लीहून आझमगडला जात होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि बचाव पथकांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने जेवर येथील कैलास रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताबाबत माहिती देताना अलिगड पोलिसांनी सांगितले की, टप्पल पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत व बचाव कार्य केले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. घटनास्थळी शांतता कायम आहे. या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.
सीएम योगींनी दिल्या सूचना
अलिगड दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावी अशा आशा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरून कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला आहे, या अपघातानंतर खाजगी बस 20 फूट खड्ड्यात कोसळली. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने मागून धडक दिली, त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या भीषण अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, मात्र बसमधील अकरा प्रवासी यात जखमी झाले आहेत. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.