मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मोठ्या उत्साहात मतदान पार पडलं. राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं असून मतदानाची टक्केवारी आणखी वाढणार आहे. त्यामुळे, आता मतदानानंतरच्या निवडणूक एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार, राज्यात महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज दिसून येत असून महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ-जवळ पोहोचत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे यंदाच्या निवडणूक निकालानंतर महायुती व महाविकास आघाडीशिवाय अपक्ष आणि इतर पक्षांच्या विजयी उमेदवारांना अधिक महत्त्व येऊ शकते. एक्झिट पोल (Exit Poll) सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामध्ये, मराठवाड्यात (Marathwada) भाजप-महायुतीला चांगलाच फटका बसू शकतो. मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रस्थान राहिलेल्या मराठवाड्यात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही जरांगे पॅटर्नची हवा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या जागा घटणार असल्याचे दिसून येते
SAS ग्रुप हैदराबादच्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीच्या 125 ते 135 जागा येण्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला 147 ते 155 जागांवर विजय मिळू शकतो. त्यामध्ये, मराठवाड्यातील 46 जागांपैकी भाजप महायुतीला 17 ते 18 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. येथे महाविकास आघाडीचं पारडं जड दिसून येत आहे. मविआला मराठवाड्यात 27 ते 28 जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे, भाजप महायुतीला मराठवाड्यात फटका बसेल असेच या सर्व्हेक्षणातून दिसून येते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकांवेळी आपली भूमिका स्पष्ट करताना सुफडा साफ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे, मतदानच्या दिवशीही सुफडा साफ ही घोषणा चांगलीच चर्चेत ठरली. विशेष म्हणजे अनेक मतदारसंघात मतदारांनी सुफडा साफ म्हणत भाजप महायुतीविरुद्ध मतदान केल्याचे व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत यंदाही मनोज जरांगे पॅटर्न आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका भाजप-महायुतीला बसणार असल्याचा अंदाज या सर्वेक्षणातून समोर येत आहे.
दरम्यान, यापू्र्वी आयएनएस आणि मॅट्रीझ प्री पोलच्या सर्वेक्षणातूनही महायुतीला स्पष्ट बहुतम दर्शवण्यात आले होते. त्यामध्येही, मराठवाड्यात भाजप-महायुतीला फटका बसत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीतही मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर भाजप युतीला फटका बसला होता, केवळ छत्रपती संभाजीनगर येथील एका जागेवरच त्यांचा उमेदवार विजयी झाला होता.
हेही वाचा
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी