नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं केवळ देशाचंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचंही मोठं नुकसान केलंय असं दिसून येतंय. या काळात मोदींची लोकप्रियता घसरुन 63 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे त्यांच्या देशा-विदेशातील 'शक्तिशाली नेता' या प्रतिमेला धक्का बसला आहे. अमेरिकन कंपनी असलेल्या मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील काही नेत्यांच्या कोरोना काळातील लोकप्रियतेचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट झाल्याचं सांगितलं आहे. 


मॉर्निंग कन्सल्टच्या मते, नरेंद्र मोदींची लोकप्रियता आतापर्यंत सर्वाधिक कमी स्तरावर आली आहे. एप्रिलमध्ये देशात कोरोनाने थैमान घातला होता. या काळात देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूंच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती. तसेच देशात कोरोना लसी, ऑक्सिजन सप्लाय, रेमडेसिवीरच्या इन्जेक्शनचा तुटवडा जाणवत होता. या काळात, खासकरुन उत्तर भारतात ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात मोदींच्या लोकप्रियतेमध्ये 22 टक्क्यांची घट झाली होती असं मॉर्निंग कन्सल्टने आपल्या अभ्यासात म्हटलं आहे. 


नरेंद्र मोदी, 2019 साली दुसऱ्यांदा मोठ्या बहुमताने निवडून आले. 2019 साली त्यांना जे बहुमत मिळाले तर ते गेल्या तीन दशकातील सर्वात मोठं बहुमत होतं. त्यामुळे एक शक्तिशाली नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. त्या तुलनेत आता मोदींच्या प्रतिमेत 22 टक्क्यांची घट झाली असून ती आता 63 टक्क्यांवर पोहोचली आहे. 


उत्तर भारतात सध्या गंगा नदीमध्ये प्रेत तरंगताना दिसत असून, नरेंद्र मोदींनी देशातील कोरोनाची परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्याचा आणि आपल्या देशातील नागरिकांसाठी असणाऱ्या लसी या विदेशात पाठवल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे. आपला जीव वाचवायचा असेल तर केवळ स्वत:वर किंवा मित्र-परिवारावर अवलंबून रहावं लागेल हे सत्य देशातील नागरिकांना समजलं आहे असं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकार चांगलं काम करतंय असं मत 59 टक्के नागिरिकाचे असल्याचं मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालात सांगण्यात आलंय. गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेत हेच मत तब्बल 89 टक्के लोकांचं होतं.


परदेशात असणाऱ्या प्रतिमेला धक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशातील लोकप्रियतेमध्ये घसरण झाली आहेच, पण त्यांची परदेशात जी प्रतिमा होती तिलाही धक्का बसल्याचं स्पष्ट झालंय. खासकरुन, नेपाळमध्ये नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. नेपाळमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून याला भारतच कारणीभूत असल्याचं तिथल्या अनेक नागरिकांचा आरोप आहे. 


महत्वाच्या बातम्या :