नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) होणाऱ्या जी - 20 (G20) परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे दिल्लीमध्ये पोहचले आहेत. यावेळी विमानतळावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं स्वागत केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंह यांनी केले. त्यानंतर विमानतळावरुन ते त्यांच्या हॉटेलसाठी रवाना देखील झाले.  तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठक देखील करणार आहेत. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या जी-20 परिषदेचं यजमानपद हे भारताकडे असून भारतात होणारी ही पहिलीच जी-20 परिषद असणार आहे.










पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणार द्विपक्षीय बैठक


या बैठकीदरम्यान 5 जी आणि 6 जी स्पेक्ट्रम, युक्रेन, अणुक्षेत्रातील प्रगती आणि नवं तंत्रज्ञान अशा मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलविन यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाचा आढावा या बैठकीत घेण्याची शक्यता आहे. पंरतु आखाती देश आणि इतर अरब देशांना जोडण्यासाठी अमेरिका, भारत आणि इतर अरब देशांसोबत एक मोठा रेल्वे करार जाहीर करण्याची योजना तयार होत असल्यासंदर्भात कोणतंही पुष्टी जेक सुलविन यांनी केली नाही. दरम्यान अमेरिका यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


पुढे बोलतांना जेक सुलविन यांनी म्हटलं आहे की, 'आमचा विश्वास आहे की भारतापासून, संपूर्ण मध्यपूर्वेतील, युरोपशी कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळेच सर्व देशांना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ तसेच धोरणात्मक लाभ मिळण्यास देखील मदत होईल. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एक अधिकृत कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते G-20 परिषदेसाठी आलेल्या नेत्यांसोबत देखील बैठक करणार आहेत. 


राजाघाटावर देखील जाणार जो बायडेन


रविवार (10 सप्टेंबर) रोजी राजाघाटावर देखील जाणार आहेत. राजाघाटावरील स्मारकांचं यावेळी ते दर्शन घेणार आहेत.  जी-20 परिषदेसाठी अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU)  यांचा समावेश करण्यात आला आहे.