अयोध्या, उत्तर प्रदेश : अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं (Ram Mandir, Ayodhya) काम जोरात सुरु आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते रामल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिरात 21 ते 23 जानेवारी दरम्यान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिराच्या गर्भगृहाचं सध्या बांधकाम सुरू आहे. राम मंदिराच्या गर्भगहाला सोन्याचा दरवाजा बसवण्यात येणार आहे. भव्य राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम जानेवारीमध्ये पूर्ण होईल, त्यानंतर मंदिर रामभक्तांसाठी खुलं केलं जाईल. 


राम मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा दरवाजा


भव्य राम मंदिर निर्माणकार्य सध्या प्रगती पथावर आहे. राम मंदिरामध्ये एकूण 42 दरवाजे बसवण्यात येणार आहेत. राम मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा वगळता इतर दरवाजे महाराष्ट्रातील सागवान लाकडापासून तयार करण्यात येत आहेत. तर, मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा दरवाजा बसवण्यात येणार आहे. या दरवाजावर सुंदर मोर, चक्र आणि फुलांचं नक्षीकाम करण्यात येईल. लाकडी दरवाज्यांवरही सुंदर नक्षीकाम करण्यात येणार आहे. 


मंदिर निर्माणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर


राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) 1000 वर्षांहून अधिक काळ तग धरून राहावं यासाठी, मंदिर निर्माणाच्या कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील भागात संगमरवरी दगड बसवण्यात येणार असून त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात येणार आहे. या दगडांच्या मधे खास विटांचा वापर केला जाईल, यामुळे मंदिराच्या आतील तापमान कमी ठेवण्यास मदत होईल.


राम मंदिर केव्हा खुलं होणार?


अयोध्येत भव्य राम मंदिराचं निर्माण काम वेगाने सुरु आहे. 30 डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याची माहिती, राम मंदिर बांधकाम समितीच्या अध्यक्षांनी दिली आहे. राम मंदिराची निर्मिती तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भक्तांना राम लल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश खुला करण्यात येणार आहे. 


भव्य राम मंदिर निर्माणकार्य


सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी राम मंदिराच्या बाजुने निर्णय दिला आणि राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी केली. 1 जून 2022 रोजी मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी करण्यात आली. डिसेंबर 2023 पर्यंत गर्भगृहाचं काम पूर्ण होईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ayodhya Ram Temple : 75 कारागिरांचं काम, भव्य प्रदर्शन..राम मंदिरात भक्तांसाठी काय असणार खास? जाणून घ्या सर्व काही