नवी दिल्ली : भारतात सापडलेल्या B.1.617 या कोरोना स्ट्रेन विरोधात अमेरिकेत वापरण्यात येणाऱ्या कोरोना लसी या अधिक प्रभावशाली असल्याचा दावा अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी केला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, अमेरिकेत वापरण्यात येणाऱ्या फायझर आणि मॉडर्ना या लसी भारतातील कोरोना स्ट्रेन B.1.617 व्हेरियंटच्या स्पाईक प्रोटिनची साखळी तोडतात असं लक्षात आलं आहे. 


स्पाईक प्रोटिन हा कोरोना स्ट्रेनचा असा हिस्सा आहे जो कोरोनाला शरीरात पसरायला मदत करतो. जर याची साखळी तोडली तर कोरोनाचा शरीरात होणारा प्रसार थांबवता येतो. त्यामुळे नंतर या स्ट्रेनचा कोणताही परिणाम होत नाही. 


अमेरिेकेचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी सांगितलं की, भारतातील कोरोनाचा जो स्ट्रेन आहे तो अधिक धोकादायक आहे. तशा प्रकारचा स्ट्रेन आणखी कुठही तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या या व्हायरसला थांबवण्यासाठी कोरोनाची लस घेणं हे अत्यंत गरजेचं आहे.  एका अहवालानुसार, एप्रिल महिन्यात अमेरिकेत B.1.617 या भारतीय कोरोनाचा स्ट्रेन सापडला होता. त्यानंतर अनेक शहरात त्याचा प्रसार झाल्याचं लक्षात आलं होतं. याच कारणाने अमेरिकेने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता. 


जागतिक आरोग्य संघटनेनेही B.1.617 हा भारतीय स्ट्रेनला चिंताजनक स्ट्रेन असल्याचं सांगितलं होतं. अमेरिकेच्या सीडीसीच्या एका अहवालानुसार, अमेरिकेत 0.7 टक्के कोरोना केसेस या भारतीय B.1.617 या स्ट्रेनच्या होत्या.


भारतात लवकरात लवकर लसीकरण पूर्ण कराव, फाऊची यांचा सल्ला
डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी न्यूज एजन्सी एएनआयला एक सविस्तर मुलाखत देताना म्हणाले होते की, "जर आपण अडचणीत असाल, जसा भारत आता आहे, त्या परिस्थितीत शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात यावं. त्यामुळे कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर वाढवण्याचा निर्णय हा योग्यच आहे." 


जर आपल्याकडे लसीच उपलब्ध नसतील त्यावेळी आपण या दोन डोसमधील अंतर वाढवू शकतो. त्यामुळे मधल्या काळात मोठ्या लोकसंख्येला लस देता येऊ शकते. पण जर लसी उपलब्ध असतील तर असं करु नये असंही डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी सांगितलं.


महत्वाच्या बातम्या :