नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीबाबत देशाच्या आठ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 46 जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. "लसीकरण सुलभ करण्यासाठी आणि लस वाया जाऊ नये यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल," असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी या बैठकीत दिलं. तसंच मोठ्या धोरणांमध्ये स्थानिक नवकल्पनांचे स्वागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी (18 मे) झालेल्या या बैठकीत कर्नाटक, बिहार, आसाम, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत टेस्टिंग, ट्रॅकिंग, कन्टेन्मेंट आणि लसीकरण या विषयांवर संवाद साधला. सोबतच कोरोनाविरोधातील लढाईत जिल्हाधिकारी हे मैदानातील सेनापती असल्याचं म्हटलं. दोन तासांपेक्षा जास्त वेळ ही बैठक सुरु होती.
'लसींचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु'
कोरोनाविरुद्धच्या या लढाईत लसीकरण हे एक सशक्त माध्यम आहे आणि त्यासाठी त्यासंबंधी असलेले सगळे गैरसमज आपल्याला दूर करायचे आहेत. कोरोनाच्या लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी अविरत प्रयत्न सुरु आहेत. आरोग्य मंत्रालय सातत्याने लसीकरणाबाबतची व्यवस्था आणि प्रक्रिया जारी करत आहे. लसीकरण सुरु राहावं आणि लस वाया जाऊ नये यासाठी सर्व राज्यांना 15 दिवस आधीच लसीकरणाचं शेड्यूल देण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं पंतप्रधान मोदी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.
'प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी आव्हानं'
जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीत मोदी म्हणाले की, आपल्या देशात जेवढे जिल्हे आहेत तेवढीच वेगवेगळी आव्हानं देखील आहेत. तुम्ही ती आव्हानं योग्यप्रकारे जाणता. त्यामुळेच जेव्हा तुमचा जिल्हा जिंकतो, तेव्हा देश जिंकतो. तुमचा जिल्हा कोरोनावर मात करतो, तेव्हा देश कोरोनावर मात करतो.
कोरोनाव्हायरसविरुद्धच्या लढाईतील शस्त्र
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "कोरोनाव्हायरसविरुद्ध लढण्यासाठी स्थानिक प्रतिबंधित क्षेत्र, मोठ्या प्रमाणात चाचणी आणि लोकांपर्यंत योग्य तसंच संपूर्ण माहिती पोहोचवणं ही प्रमुख शस्त्रे आहेत. रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत, कुठे उपलब्ध आहेत? ही माहिती सहजरित्या मिळाली तर लोकांची गैरसोय होत नाही. याचप्रकारे औषधं आणि सामुग्रीच्या काळ्याबाजारावरही लगाम लागायला हवा. काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी."
नवीन कल्पना राबवण्यासाठी सूट
"जर तुम्हाला वाटतं की सरकारने बनवलेल्या धोरणात जिल्हास्तरावर नव्या कल्पनांची आवश्यकता आहे, तर मी तुम्हाला त्यासाठी पूर्ण सूट देतो. तुम्ही नवीन कल्पना राबवा. या कल्पनांमुळे देश आणि राज्यांना फायदा झाला तर त्या सरकारपर्यंतही पोहोचवा," असं पंतप्रधान मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.
ऑक्सिजन प्लांट लावण्यावर भर
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "पीएम केअर्सच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट्स लावण्यावर वेगाने काम केलं जात आहे. अनेक रुग्णालयांमध्ये हे ऑक्सिजन प्लांट कार्यरतही झाले आहेत. नुकतंच चंदीगडमध्ये ऑक्सिजन प्लांट लावण्यात आला आहे."