Coronavirus India Cases : भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा भयावह असून दिवसेंदिवस हा आकडा उच्चांक गाठत आहे. या आकड्यानं जगभरातील इतर अनेक देशांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आतापर्यंत एका दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले होते. परंतु, आता भारतानं हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 267,334 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 4529 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3,89,851 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत 12 जानेवारी रोजी जगभरात सर्वाधिक 4468 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. 


18 मेपर्यंत देशभरात 18 कोटी 58 लाख 9 हजार 302 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 13 लाख 12 हजार 155 लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 32 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20.08 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 15 टक्क्यांहून अधिक आहे. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 54 लाख 96 हजार 330
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 19 लाख 86 हजार 363
एकूण सक्रिय रुग्ण : 32 लाख 26 हजार 719
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 83 हजार 248


देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.10 टक्क्यांवर आहे. तर रिकव्हरी रेट 85 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या घटून 13 टक्क्यांवर आली आहे. कोरोना सक्रिय रुग्णसंख्येत जगात भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 


राज्यात मंगळवारी 52,898 रुग्ण बरे होऊन घरी तर 28, 439 नवीन रुग्णांचे निदान


राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. काल 52,898 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर  28,438 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 49, 27, 480 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.69% एवढे झाले आहे.


राज्यात काल 679 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,15, 88, 717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,33, 506 (17.2 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 30, 97, 161 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,004 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 4,19,727 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


सुलभ लसीकरण आणि अपव्यय टाळण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल : पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीबाबत देशाच्या आठ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 46 जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. "लसीकरण सुलभ करण्यासाठी आणि लस वाया जाऊ नये यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल," असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी या बैठकीत दिलं. तसंच मोठ्या धोरणांमध्ये स्थानिक नवकल्पनांचे स्वागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी (18 मे) झालेल्या या बैठकीत कर्नाटक, बिहार, आसाम, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत टेस्टिंग, ट्रॅकिंग, कन्टेन्मेंट आणि लसीकरण या विषयांवर संवाद साधला. सोबतच कोरोनाविरोधातील लढाईत जिल्हाधिकारी हे मैदानातील सेनापती असल्याचं म्हटलं. दोन तासांपेक्षा जास्त वेळ ही बैठक सुरु होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :