लखनऊ : नुकतंच उत्तर प्रदेशमध्ये ब्लॉक प्रमुखांची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपने धमाकेदार कामगिरी केली असून एकूण 825 जागांपैकी 626 ठिकाणी पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने आपणच राज्यातील क्रमांक एकचा पक्ष असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. भाजपच्या या विजयावर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केलं आहे. 


समाजवादी पक्षांने 98, काँग्रेस 5 आणि इतर पक्षांचे 96 उमेदवार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे यश हे टीम वर्कचे यश असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


 






उत्तर प्रदेशची ब्लॉक प्रमुख पदासाठी झालेली ही निवडणूक अनेक अर्थाने गाजली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्याचं पहायला मिळालं. काही ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही झाल्याचं पहायला मिळालं. यावर योगी आदित्यनाथ यांनी सरकारी यंत्रणा भाजपसाठी राबवल्याचा आरोप समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने केला होता. 


या निवडणुकीत लखीमपूर खेरी या ठिकाणी एका महिलेशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. निवडणुकीचा अर्ज भरायला जाताना त्या महिलेला अनेक कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान त्या महिलेचे कपडेही फाटले होते. विशेष म्हणजे त्या वेळी तिथे पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्या महिलेशी गैरवर्तन करणारे कार्यकर्ते हे भाजपचे असल्याचा आरोप काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने केला आहे. 


महत्वाच्या बातम्या :