मुंबई : सलग तीन दिवासांच्या घसरणीनंतर चांदीच्या दरात आज 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज एक किलो चांदीसाठी 69,300 रुपये मोजावे लागणार आहेत. तुलनेत सोन्याच्या भावात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,810 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,810 रुपये इतका आहे.
चांदीच्या दराचा विचार करता 7 जुलैला 600 रुपये, 8 जुलैला 1000 रुपये आणि 9 जुलैला 200 रुपयांनी चांदीच्या दरात घसरण झाली होती. तीन दिवसांच्या घसरणीनंतर आता पुन्हा 500 रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात 9 जुलैला 170 रुपयांची घसरण झाली होती. त्याच्या आधी सलग आठ दिवस सोन्याच्या दरात अगदीच किरकोळ का असेना वाढ होत होती. आज सोन्याचे दर स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
महत्वाच्या बातम्या :
- World Population Day 2021 : का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
- Copa America 2021 final : तब्बल 28 वर्षांनी कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटीनाची विजयाला गवसणी, गतविजेत्या ब्राझीलला नमवलं
- Buldhana : सासरच्या मंडळींकडून जावयाला असाही 'प्रसाद'; 11 जणांविरोधात गुन्हा दाखल