Yogi Adityanath Government Swearing  : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ केव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याची चर्चा सुरु झाली होती. अखेर या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.  


योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी दुपारी 4 वाजता दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींसह (PM Narendra Modi) विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. याशिवाय अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 200 व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 


उत्तर प्रदेशमध्ये योगींची जादू पुन्हा चालली आहे. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. यूपीच्या प्रत्येक जिल्ह्यात एलईडी स्क्रीन लावून सोहळा थेट दाखवण्याची योजना करण्यात येत आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. मंगळवारी अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही स्टेडियमची पाहणी केली आहे. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचाही विचार केला जात आहे. 


योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात पुन्हा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असले तरी यावेळी यूपीमध्ये किती उपमुख्यमंत्री होणार आणि मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार यावर सस्पेन्स कायम आहे.  उत्तर प्रदेशमध्ये नवीन मंत्रीमंडळ आणि सरकार स्थापनेसाठी भाजपच्या बैठका आणि विचारमंथन सुरु आहे.