Apple Watch : स्मार्ट घड्याल फक्त वेळ पाहण्यासाठी नसतात, तर कधी कधी ते आपल्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. अ‍ॅपलच्या घड्याळामुळे एका 34 वर्षीय डेंटिस्टचे प्राण वाचले आहेत. नितेश चोप्रा असे या डेंटिस्टचे नाव आहे.  


स्मार्टफोन आणि गॅझेट्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. आता लोक आपला बराच वेळ यावर घालवू लागले आहेत. परंतु, अॅपल वॉचमुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे. 12 मार्च रोजी हरियाणातील यमुना नगर येथे राहणारे दंतचिकित्सक नितेश चोप्रा यांना छातीत अस्वस्थता जाणवली. त्यावेळी त्यांनी अॅपलच्या घड्याळाद्वारे त्यांच्या ईसीजीचे निरीक्षण केले. यावेळी रिदम अलर्ट दिसून आला. त्यामुळे नितेश त्यांची पत्नी नेहा यांनी त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या रूग्णालयात त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या अॅपल वॉचमधील ECG रिपोर्ट दाखवला.


डॉक्टरांनी अ‍ॅपल वॉचमधील ECG पाहून त्यांनीही ECG केला. त्यावेळी तोही अनियमित दाखवण्यात आला. त्यामुळे रूग्णालयाने नितेश यांना ताबडतोब अॅडमिट केले. त्यानंतर त्याच संध्याकाळी त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली, यामध्ये त्यांच्या हृदयाची एक धमनी पूर्णपणे ब्लॉक झाल्याचे लक्षात आहे.   


या सर्व घडामोडीनंतर नितेश यांच्या पत्नी नेहा यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांचे पत्र लिहून आभार मानले आहेत. "तुम्ही आणि माझ्या पतीने दिलेल्या तंत्रज्ञानामुळेच आम्ही रुग्णालयात पोहोचलो, आता माझ्या पतीची तब्येत चांगली आहे. तुम्हाला खूप प्रेम आणि आनंद मिळो यासाठी मी प्रार्थना करते. माझ्या पतीचे प्राण वाचवल्याबद्दल धन्यवाद."  अशा भावाना नेहा यांनी व्यक्त केल्या आहेत. नेहा यांच्या या पत्राला टिम कुक यांनीही उत्तर दिले आहे. "तुम्ही वैद्यकीय मदत घेतली आणि तुम्हाला आवश्यक असलेले उपचार वेळेत मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला. तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद, निरोगी रहा." असे उत्तर टिम कुक यांनी दिले आहे. 


महत्वाच्या बातम्या