UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस अन् भाजपसह सर्वच पक्षानं आपली तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 40 टक्के तिकिटे महिलांना देणार असल्याची मोठी घोषणा प्रियंका गांधी यांनी केली. 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आपली रणनिती तयार करण्यास सुरुवात केली आहे. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये आक्रमक झाल्या आहे. लखनौमध्ये प्रियंका गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. देशातील आणि उत्तर प्रदेशमधील महिलांना ही पत्रकार परिषद समर्पित असल्याचे यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या. यावेळी त्यांनी ‘लड़की हूँ लड सकती हूँ’ हा नारा दिला. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत आम्ही ४० टक्के तिकिटे महिलांना देणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये बदल हवा असं, म्हणणाऱ्या सर्व महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याची प्रगती हवी आहे असं ज्यांना वाटतं त्या महिला राजकारणात पूर्ण सहभागी होतील.’ जातीच्या आधारावर महिलांना तिकीट दिलं जाणार नाही, पात्रतेच्या आधारावर तिकीट दिलं जाईल. विधानसभा निवडणुकीत आम्हाला उमेदवार मिळतील, आम्हीही लढू. जर तुम्ही या वेळी मजबूत नसलात तर पुढच्या वेळी तुम्ही मजबूत व्हाल. माझ्या हातात असते तर ५० टक्के तिकिटे महिलांना दिली असती. यामागे मुख्य कारण म्हणजे ज्या महिला एकत्रितपणे एक शक्ती बनून लढत नाहीत. त्या महिलांना जाती धर्मात विभागले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, असं यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या. 







2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील 78 जागांपैकी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. तर गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 403 पैकी 7 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. महिलांना ४० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या या निर्णयामुळे काँग्रेस मतदारांना आकर्षित करू शकेल, असं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलं.