हैदराबाद : जवळपास 80 दिवसांनंतर आज (8 जून) देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती असलेलं तिरुपती बालाजी मंदिर उघडलं आहे. 8 आणि 9 जून या दोन दिवसात मंदिराचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच दर्शन घेता येणार आहे. यासाठी त्यांनाही ऑनलाईन टाईम स्लॉट बुक करावा लागणार आहे. 10 जून रोजी मंदिर कर्मचाऱ्यांसह स्थानिक भाविक दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकतात. तर 11 जून रोजी सकाळी साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसातपर्यंत देशाच्या इतर भागातून येणाऱ्या भाविकांना बालाजीचं दर्शन घेता येणार आहे.
तिरुपती बालाजी मंदिर 20 मार्चपासून बंद होतं. इथे याआधी दरदिवशी 80 हजार ते एक लाख भाविक दर्शनासाठी येत होते. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मंदिराच्या दान-देणगीत जवळपास 500 कोटी रुपयांची घट झाली आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दहा वर्षांखालील मुलांना आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना दर्शनाची परवानगी नाही, असं तिरुमाला तिरुपती देवस्थानम् ट्रस्टने स्पष्ट केलं. मंदिर खुलं झालं असलं तरी सध्या फक्त भगवान तिरुपतीचंच दर्शन होणार आहे. परिसरातील इतर मंदिरं आणि स्वामी पुष्करिणीमध्ये लोकांना प्रवेश करता येणार नाही.
मंदिरात कोविड-19 च्या चाचणीसाठी एक कॅम्प असेल, ज्यात दररोज 200 कर्मचारी आणि भाविकांची रॅण्डम चाचणी होईल.
दरम्यान एका दिवशी केवळ 6000 भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. एका तासात 500 लोकांना दर्शनाची परवानगी आहे. एकूण 6000 भाविकांपैकी 3000 लोकांना व्हीआयपी तिकीटावर (300 रुपये प्रती व्यक्ती) दर्शन घेता येणार आहे. यासाठीही ऑनलाईन स्लॉट बुकिंग 8 जून रोजी सकाळीच सुरु झाली आहे.
लॉकडाऊनचा फटका, देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिराने 1300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं!
मंदिराने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना
- - मंदिराचे कर्मचाऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करुन 6 आणि 7 जून रोजी दर्शन घेता येणार आहे. सुरुवातीचे तीन दिवस म्हणजेच 8, 9 आणि 10 जून रोजी मंदिराचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्शनाची परवानगी असेल. मंदिरात सुमारे 21 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
- 10 जूनपासून लोकल भाविकांसाठी टोकन काऊंटर सुरु होतील. प्रत्येक तासाला केवळ 500 जणांनाच दर्शनाची परवानगी असेल.
- 11 जूनपासून 3000 लोकांसाठी 300 रुपयांचे व्हीआयपी दर्शन तिकीट उपलब्ध होतील. याची बुकिंग ऑनलाईनच होईल. यासाठी ऑनलाईन कोटा 8 जूनपासूनच सुरु होणार आहे. लोकांना आपल्या सोयीनुसार तारीख निवडता येणार आहे.
- व्हीआयपी दर्शन सकाळी 6.30 पासून 7.30 वाजपेर्यंत असेल. यासाठीही व्हीआयपी भाविकाला सेल्फ प्रोटोकॉलमध्येच जावं लागणार. कोणतंही शिफारस पत्र मिळणार नाही.
- मंदिरातील श्रीवारी हुंडीजवळ (दानपेटी) भाविकांना हॅण्ड सॅनिटायजर दिलं जाईल.
- मंदिरात मास्क लावणं, हात सॅनिटाईज करणं, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल टेम्परेचर इत्यादी गोष्टी अनिवार्य आहेत.
- मंदिरात भाविकांना ज्या खोल्या धर्मशाळेत दिल्या जातील त्या रिकाम्या झाल्यानंतर 12 तासांनीच दुसऱ्यांना दिल्या जातील. खोली दर दोन तासांनी सॅनिटाईज केली जाईल.
- धर्मशाळेच्या खोल्याही ऑड-इव्हन फॉर्म्युल्याच्या आधारावर आरक्षित केल्या जातील. एक खोलीत जास्तीत जास्त दोन जणांनाच राहता येणार आहे. 24 तासांपेक्षा जास्त वेळ खोली दिली जाणार नाही.
- मंदिर दर दोन तासांनी सॅनिटाईज केलं जाईल.
- मंदिरात लग्नासाठीही 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल.
गुजरातमधील सोमनाथ मंदिरही खुलं
याशिवाय गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरही भाविकांसाठी खुलं झालं आहे. गिर सोमनाथ जिल्ह्यात असलेलं सोमनाथ मंदिर आज 80 दिवसांनी उघडण्यात आलं. भगवान शंकराच्या 12 ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेलं सोमनाथ मंदिर सध्या फक्त स्थानिक भाविकांसाठीच खुलं केलं आहे. भाविकांसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. रांगेत उभं राहण्यासाठी मंदिराच्या आत ठिकठिकाणी पायांचे स्टिकर लावले आहेत, जेणेकरुन लोक तिथेच उभे राहून सोशल डिस्टन्सिंग पाळतील.