(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर बनू शकत नाही, कोर्टाच्या निर्णयानंतरच ते शक्य होईल : रामदास आठवले
मुस्लीम समाजावर याप्रकरणी अन्याय होऊ नये. मूळ बुद्धभूमी असल्याने त्या ठिकाणी बौद्ध मंदिर व्हावं अशी आमची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाल मान्य असेल, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
मुंबई : उद्धव ठाकरे अयोध्येला एकदा काय, दहावेळा जरी गेले तरी मंदिर बनू शकत नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिराचं बांधकाम होऊ शकतं, उद्धव ठाकरेंच्या जाण्यानं काही होणार नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
शिवसेना खासदार उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जात आहेत, त्यांना शुभेच्छा. लोकांच्या भावनांचा विचार केला तर राम मंदिर व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. हिंदू समाजाला जी जागा मिळेल, त्यात राम मंदिर बांधायला हवं. मात्र उद्धव ठाकरे त्याठिकाणी एकदा गेले काय आणि दहा वेळा जरी गेले, तरी त्यांच्या जाण्याने काही होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच तिथे राम मंदिर बनू शकतं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
निवडणूक जिंकण्यासाठी अयोध्या दौऱ्याची गरज नाही. शिवसेनेच्या खासदारांना अयोध्या दाखवावी म्हणून उद्धव ठाकरे त्यांना नेत असतील. निवडणुकीत फक्त राम मंदिराच्या मुद्द्यावर यश मिळालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला सबका साथ सबका विकासचा मुद्दा होता, त्यामुळे हे प्रचंड यश मिळालं, असं रामदास आठवले म्हणाले.
मुस्लीम समाजावर याप्रकरणी अन्याय होऊ नये. मूळ बुद्धभूमी असल्याने त्या ठिकाणी बौद्ध मंदिर व्हावं अशी आमची मागणी आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाल मान्य असेल, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे 16 जून रोजी अयोध्येत जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदारही असणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार हे आधीच ठरलं होतं. मात्र त्या दौऱ्याची तारीख समोर आली नव्हती. उद्धव ठाकरे अयोध्येत जातील आणि राम मंदिर निर्मितीचा आढावा घेतील, असंही समजत आहे.