Kiren Rijiju Car Accident:  जम्मू-काश्मीरमधील बनिहालजवळ केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली. या अपघातात रिजिजू यांच्या बुलेट प्रूफ कारचे थोडं नुकसान झालं आहे. शनिवारी झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


जम्मू-काश्मीर पोलिसांनी कार अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. रामबन पोलिसांनी सांगितले की, रस्ते मार्गे जम्मूहून श्रीनगरकडे येत असताना केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या कारचा किरकोळ अपघात झाला आहे. केंद्रीय मंत्री रिजिजू आणि इतर कोणालाही दुखापत झाला नाही. रिजिजू यांना श्रीनगरकडे नेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


 






सोशल मीडियावर समोर आलेल्या अपघाताच्या व्हिडिओमध्ये कार ट्रकच्या मागील बाजूस आदळल्याचे दिसत आहे. काही सुरक्षा कर्मचारी घटनास्थळाकडे धावताना दिसत आहेत. त्याचवेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हेही सुरक्षेच्या गराड्यात दिसत आहेत.


या कारणांमुळे रिजिजू जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर


केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू शनिवारी काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू विद्यापीठात डोगरी भाषेतील भारतीय संविधानाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रिजिजू यांना आमंत्रित करण्यात आले होते.


याशिवाय 'कायदेशीर सेवा शिबिर'मध्ये सहभागी होण्यासाठी जम्मूहून उधमपूरला जात असल्याची माहिती रिजिजू यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. न्यायाधीश आणि नालसा ( NALSA) टीम सोबत केंद्र सरकारच्या योजनांचे अनेक लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यासोबत ते म्हणाले की, आता संपूर्ण प्रवासादरम्यान सुंदर रस्त्याचा आनंद घेऊ शकतो.