नवी दिल्ली : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल झालेल्या सुरक्षा बल आणि नक्षल्यांच्या चकमकीत 22 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आणि देश पुन्हा एकदा हादरला. शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर अचानक हल्ला केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाल्याचं म्हटलं गेलं. याच घटनेबाबत प्रतिक्रिया देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं ठणकावून सांगितलं.
सदर घटनेमुळंच आपण आपला आसाम दौरा रद्द करत असल्याचा निर्णयही त्यांनी घेतला. आसाम दौरा मागे सोडून गृहमंत्री दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, या हल्ल्यामध्ये 20 ते 22 जवान शहीद झाल्याचं म्हटलं जात असून, अजूनपर्यंत जवानांचा शोध घेण्याचं कामही सुरु असल्याचं कळत आहे. नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्यानंतर त्यांची शस्त्रास्त्रही पळवल्याची माहिती आहे. नक्षलवाज्यांची सर्वात मोठी बटालियन असणाऱ्या हिडमा हा या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड असल्याचं म्हटलं जात आहे. या हल्ल्याचं गांभीर्य पाहता, हल्लेखोरांचा निषेध करत अमित शाह यांनी त्यांचा आसाम येथील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील दौरा रद्द केला.
दरम्यान, अमित शाह यांनी रविवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी या हल्ल्याबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री बघेल यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांना सदर हल्ल्याबाबतची सविस्तर माहिती दिली.
Mumbai Local: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; मुंबई लोकल बंद नाही, पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख
या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर दु:ख व्यक्त करत या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं सांगितलं. त्यानी आपल्या सोशल मीडियावरील संदेशात म्हटलं आहे की, "माझ्या संवेदना मावोवाद्यांच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या जवानांच्या परिवारासोबत आहेत. त्यांचे बलिदान कधीही विसरण्यात येणार नाही."