कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, बंगालच्या हावडा येथील मिठाईच्या दुकानात विधानसभा निवडणुकीचे एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. बंगालची मिठाई सर्वदूर प्रसिद्ध आहे. याच पश्चिम बंगालच्या मिठाईतही निवडणुकीचे रंग पहायला मिळत आहेत. बंगालच्या हावडा येथील मिठाईच्या दुकानात तीन आघाडीच्या नेत्यांचे मिठाईचे पुतळे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह संयुक्त मोर्चाच्या तीन नेत्यांच्या  समावेश आहे .

  
हावडा भागातील एका मिठाईचे दुकान सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. मिठाईच्या दुकानांमध्ये संयुक्त मोर्चात डावे, कॉंग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंटच्या नेत्यांची पुतळे मेणाचे नाहीत मिठाईत बनवण्यात आले आहेत. मूर्तिकाराने आपली सर्व सर्जनशीलता वापरून हे पुतळे तयार केली आहेत. मोदींच्या पुतळ्यात मोदींनी  वाढवलेली दाढी, मोदी जॅकेट, भाजपच्या कमळ चिन्हासह अर्धा परिधान केलेला कुर्ता, बुटापासून सगळं हुबेहूब साकारलं आहे. नंदीग्राममध्ये झालेल्या दुखापतीमुळे ज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्हिलचेयरच्या निवडणुकीत प्रचार करत आहेत, त्याचप्रमाणे मिठाईच्या दुकानातील  पुतळाही व्हिलचेअरवर  उभारला गेला आहे. 


पश्चिम बंगाल निवडणुकित चर्चा जरी भाजपची असली तरी मिठाई दुकानदार संयुक्त मोर्चा, डावे, कॉंग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंटला विसरले नाहीत. या दुकानाने त्यांचे तीन रंग असलेले पुतळे- डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमान बोस, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि आयएसएफचे प्रमुख अब्बास यांच्यावर एकत्रितपणे पुतळा साकारला  आहे.  बरं या दुकानात केवळ पुतळे नाही तर वेगवेळ्या पक्षांची  निवडणूक चिन्हं असलेली मिठाई देखील तयार करण्यात आली आहे.


'खेला होबे विकास होबे' या घोषणेवर ही निवडणूक रंगत आहे. ही घोषणा देखील मिठाईतून साकारण्यात आली आहे. हावडामधील निवडणुका शांततेत होण्यासाठी आणि लोकांना मतदानाची प्रेरणा देण्यासाठी त्याबरोबरच त्यांचा हक्क बजावण्याचा संदेश देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये मिठाईंपेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. यावर बोलताना मिठाई दुकानाचे मालक कॅस्टो हलदार म्हणाले की, हे पुतळे मिठाईचे असतात आणि ते किमान सहा महिने टिकू शकतात. ते म्हणाले की, लोकांना समजून घेण्याची गरज आहे की आपण ज्या पक्षाला मतदान कराल त्यांना करा. पण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली पाहिजे. आम्हाला सुशासन आणि येथे कोणतेही सरकार येईल त्यांच्याकडून विकास हवा आहे.