Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: उज्जैनमधील एका हनुमानाच्या मंदिराची सध्या देशभर चर्चा रंगली आहे.

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: 2028 च्या सिंहस्थ महाकुंभाच्या तयारीनिमित्त, उज्जैनमधील कंठाल चौक ते छत्री चौक या मार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. याच मदनलाल शर्मा मार्गावरील सती गेटजवळ (नई पैठ आणि छत्री चौकाजवळ) हनुमानाची उभी मूर्ती (Ujjain Khade Hanuman Mandir) असलेले एक मंदिर आहे. हे मंदिर 170 वर्षे जुने, म्हणजेच 1857च्या काळातील असल्याचे मानले जाते. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी हे मंदिर अन्यत्र हलवण्याची योजना महानगरपालिकेने आखली होती. 4 आणि 5 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या पथकाने मंदिराची वास्तू पाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर भगवान हनुमानाची मूर्ती हलवण्याची वेळ आली. प्रशासनाने प्रयत्न केले, परंतु हनुमानाची ती उभी मूर्ती इंचभरही हलली नाही. चार दिवसांत मूर्ती हलवण्याचे चारही प्रयत्न अयशस्वी ठरले. हनुमानाची मूर्ती हटवण्यास इंजिनिअर हतबल आणि तंत्रज्ञानही अपयशी ठरल्याचे दिसून आले. सध्या या मंदिराची देशभर चर्चा रंगली आहे.
सध्या सदर हनुमानाची उभी मूर्ती तिच्या मूळ जागी सुरक्षित आहे. मंदिराची वास्तू पाडल्यानंतर, मूर्तीच्या संरक्षणासाठी तिथे एक तात्पुरता मंडप (कॅनपी) उभारण्यात आला आहे. भगवान हनुमानाची स्वतःचीच ती जागा सोडण्याची इच्छा नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आता प्रशासनाच्या या उपक्रमात 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (ASI) विभागाने लक्ष घातले असून ऐतिहासिक नोंदींची तपासणी केली जात आहे. ही मूर्ती 170 वर्षांहून अधिक जुनी असून तिचा संबंध परमार राजवंश आणि राजा भोज यांच्या काळाशी असू शकतो, असे सांगितले जात आहे. जर हा दावा खरा ठरला, तर ही मूर्ती 1000 वर्षे जुनी मानली जाऊ शकते; मात्र याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मंदिराचे मुख्य पुजारी पंडित महेश बैरागी यांचे कुटुंब पिढ्यानपिढ्या या मंदिराच्या सेवेत समर्पित आहे. (Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News)
नेमकं प्रकरण काय? (Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News)
उज्जैनमधील खडे हनुमान मंदिर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील सती गेट परिसरात, कंठाल चौक ते छत्री चौक मार्गावर हे हनुमानाचे खडे मंदिर आहे. मंदिराशी संबंधित उपलब्ध कागदपत्रांनुसार त्याची स्थापना सुमारे 1857 च्या काळात झाल्याचा दावा केला जातो आणि त्यामुळे मंदिराचा इतिहास साधारण 170 वर्षांहून अधिक जुना मानला जातो. मंदिरातील हनुमानाची सुमारे 8 फूट उंच उभी प्रतिमा हे या स्थळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 2028 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून या मार्गाचे रुंदीकरण सुरू असून, त्यासाठी मंदिराचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र मंदिराची रचना हटवल्यानंतरही हनुमानाची प्रतिमा जागेवरून हलवण्यात प्रशासनाला वारंवार अपयश आले. हायड्रॉलिक यंत्रसामग्री आणि अन्य तांत्रिक पद्धतींचा वापर करूनही प्रतिमा हलली नसल्याने ही घटना चर्चेत आली आहे.
पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मते, प्रतिमा अतिशय मजबूत दगडातून तयार करण्यात आलेली असू शकते आणि तिचा पाया जमिनीत किती खोलवर आहे, याबाबत स्पष्ट माहिती नाही. काही तज्ज्ञांनी या शिल्पशैलीचा संबंध परमारकालीन किंवा राजा भोज यांच्या काळाशी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रतिमेचे खरे ऐतिहासिक वय 170 वर्षांपेक्षा अधिक असण्याची शक्यता चर्चेत आली असली तरी, ती सुमारे 1000 वर्षे जुनी असल्याचा दावा अद्याप वैज्ञानिक किंवा अधिकृतरीत्या निश्चित झालेला नाही. त्यामुळे या प्रतिमेचे पुरातत्त्वीय महत्त्व तपासण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रतिमा हलत नसल्याच्या घटनेकडे अनेक भाविक श्रद्धेच्या दृष्टीने पाहत असून, मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येत आहेत. मंदिराच्या रचनेचा काही भाग हटवण्यात आल्यानंतर प्रतिमेच्या संरक्षणासाठी विशेष आवरण किंवा तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनासमोर आता रस्ता रुंदीकरण आणि या प्राचीन धार्मिक-ऐतिहासिक वारशाचे संरक्षण, असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खडे हनुमान मंदिराचा इतिहास, प्रतिमेचे खरे वय आणि तिच्या पायाची रचना याबाबत अधिकृत पुरातत्त्वीय तपासणी झाल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले मूर्ती हटेना!, उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरणात 'चमत्कार', VIDEO:
Before You Go
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?























