Udaipur Violence : चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याने दम तोडला; उदयपूरमध्ये तणाव, इंटरनेटही बंद
Udaipur Stabbing : उदयपूरमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यानं चाकूनं हल्ला केला. या घटनेनंतर विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण आज त्याचा एमबी रुग्णालयात मृत्यू झाला.
Udaipur Violence : उदयपूरमधील एका घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यानं चाकूनं हल्ला केला. या घटनेनंतर विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण आज त्याचा एमबी रुग्णालयात मृत्यू झाला. विद्यार्थीच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त रुग्णालयाबाहेर तैनात करण्यात आला आहे. रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात मोबाईल इंटरनेट सेवा बंद होती. येथील मुखर्जी नगर चौकात रविवारी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी महाराणा भूपाल शासकीय रुग्णालयापर्यंत रॅली काढली. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात भेटू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.
उदयपूरचे पोलिस अधीक्षक योगेश गोयल म्हणाले, "बाजार खुले आहेत पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीमुळे रविवारीही मोबाईल इंटरनेट सेवा बंद राहिली. परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उदयपूरमध्ये नेमकं झाले तरी काय?
16 ऑगस्ट रोजी शुक्रवारी 10 वीच्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर चाकूने वार केले होते, त्यानंतर जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने आरोपी विद्यार्थ्याचे घर पाडले. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.