Murshidabad News : सध्या देशभरात परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. निसर्गाचं हे रौद्र रुप पाहून सारेच अवाक् झाले आहेत. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत लोक पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे हैराण झाले आहेत. आता पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मजली इमारत काही सेकंदात गंगा नदीत वाहुन गेली आहेत. 


मुर्शिदाबादमध्ये (Murshidabad) पाण्याची पातळी वाढल्यानं गंगेच्या काठावर बांधलेलं दुमजली घर पत्त्याप्रमाणं कोसळलं आणि नदीत वाहून गेलं. हा संपूर्ण प्रकार उपस्थित लोकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीसोबतच एक झाड आणि शेतजमिनीचा मोठा भागही गंगा नदीत बुडाला आहे. गंगेच्या पाण्याच्या पातळीत सातत्यानं होणारी वाढ आणि नदीचं उग्र रूप पाहता नदीकाठावर राहणारे लोक आपापली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. पाण्याची पातळी वाढल्यानं 7 ते 8 घरांना भेगा पडल्या आहेत. 


उत्तर प्रदेशमध्ये गंगेचं रौद्ररुप 


केवळ बंगालच नाही तर उत्तर प्रदेशातही परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळं नद्या-नाल्यांना पूर आला आहे. तर गंगेच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये गंगेच्या पातळीत वाढ झाली असून धोक्याची पातळी गाठली आहे. तर प्रयागराजमध्येही हीच स्थिती आहे. त्यामुळे अनेक भागांत लोकांची घरंही पाण्याखाली गेली आहे. पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. वाराणसीमध्येही गंगेनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत. 


प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या अयोद्धेतही मुसळधार पाऊस सुरु आहे. गुप्तर घाटावर (Guptar Ghat) दरदिवशी हजारो पर्यटक येत असतात. पण सध्या गुप्तर घाटाच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंदिरांजवळ पाणी पोहोचलं आहे. पुरामुळे अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेकांना घाटावर असलेली त्यांची दुकानं हटवावी लागली आहेत. 


अयोध्येला लागून असलेल्या गोंडा जिल्ह्यातही पुरानं कहर केला आहे. गोंडा येथे लोकांच्या घरांसोबत शाळाही पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक गावात सुमारे आठ ते दहा फूट पाणी साचलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. घरांभोवती साचलेल्या पाण्यामुळे अनेक लोक अडकून पडले आहेत. अनेक भागांत प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.