On this day in history 16 October : 16 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini Birthday) यांचा आज वाढदिवस. सोबतच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnayke) यांचाही आज जन्मदिवस. आजच्याच दिवशी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या झाली होती. भारतीय नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे निधन 2003 साली आजच्याच दिवशी झाले होते. आजचा 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन (world food day )म्हणूनही साजरा केला जातो. 


1854 : ऑस्कर वाईल्ड यांचा जन्म


आयरिश लेखक व नाटककार ऑस्कर वाईल्ड  यांचा जन्म. 'कलेसाठी कला' या मताचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांच्या नाटकांची मराठीतही रुपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत 'दूरचे दिवे' हे नाटक 'अ‍ॅन आयडियल हजबंड'चे रुपांतर आहे. 1963 मध्ये त्यांचे साहित्य 'द वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड' या नावाने संकलित झाले आहे. 


1890 : अनंत हरी गद्रे यांचा जन्म


वार्ताहर, संपादक, समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ अनंत हरी गद्रे यांचा जन्म. ’मौज’ आणि ’निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम चालवले होते.


1907 : सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांचा मृत्यू 4 ऑक्टोबर 1982 रोजी झाला.
 


1946 : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा आज जन्मदिवस


ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा आज जन्मदिवस. बिजु जनता दल पक्षाचे संस्थापक असलेले पटनायक एक लेखक देखील आहेत.


1948 : अभिनेत्री हेमा मालिनी यांचा जन्मदिन  (Hema Malini Birthday)
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी झाला. त्या सध्या खासदार देखील आहेत. त्यांनी 1968 सालच्या सपनो का सौदागर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हेमा मालिनी यांनी  अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिका केली. 1970 च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्री अशी त्यांची ओळख. 1972  सालच्या सीता और गीता चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. 1980 साली हेमा मालिनी यांनी अभिनेता धर्मेंद्र सोबत विवाह केला. 2000 साली मध्ये भारत सरकारने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला पद्मश्री पुरस्कार बहाल केला.  


1959 : मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचा जन्म. ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते.


1944 : उद्योजक गुरुनाथ प्रभाकर ओगले याचं निधन: 'प्रभाकर कंदिल'चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक  


1948 : माधव नारायण तथा माधवराव जोशी यांचं निधन नाटककार. जळगाव येथे झालेल्या 34 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष.  
 
1951 : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या  (Liaquat Ali Khan)
लियाकत अली खान हे पाकिस्तानाचे पहिले पंतप्रधान होते. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होऊन वेगळे होण्यापूर्वीच्या 1946 सालातील भारताच्या अंतरिम शासनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते भारताचे पहिले अर्थमंत्री होते. ते मुस्लिम लीगेचे अध्यक्ष व पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर जनरल मुहम्मद अली जीना यांच्या विश्वासू वर्तुळातील राजकारणी होते. लियाकत यांची एका अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली. लियाकत अली खान हे एका रॅलीत सहभागी होण्यासाठी आले असता, त्यांची 16 ऑक्टोबर 1951 रोजी अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली.
 
1994 : पश्चिम बंगाल येथील भारतीय स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक आणि राजकारणी गणेश घोष यांचे निधन.


२०१३: भारतीय नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे निधन


भारतीय नाटककार  गोविंद पुरुषोत्तम देशपांडे  हे एक मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक होते. गोविंद देशपांडे यांचा जन्म 2 ऑगस्ट, 1938 रोजी झाला होता.  हे एक मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक होते. सातारा जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव.  जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी चीन हा विषय घेऊन पीएच.डी.केली.  त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. ते दिल्ली विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले होते. ते चिनी भाषा-तज्ज्ञ होते, आणि भारत-चीन राजकीय संबंधाचे जाणकार होते. गो.पुंचा धाकटा भाऊ दिलीप आणि त्याच्याहून धाकटी बहीण ज्योती सुभाष. ज्योती सुभाष आणि त्यांची कन्या अमृता सुभाष या दोघीही लेखिका आणि अभिनेत्री आहेत.  गो.पु. देशपांडे यांनी इंग्रजी-मराठीत वैचारिक, रंगभूमीविषयक, राजकीय आणि साहित्यविषयक लेखन भरपूर केले. प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात गो.पु. देशपांडे यांनी विचारनाट्याची धारा पहिल्यांदा निर्माण करण्याचा यत्न केला.  त्यांचा मृत्यू 16  ऑक्टोबर 2013 साली झाला.


16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन 
दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने  (Food and Agriculture Organization, FAO)  जागतिक अन्न दिन हा उपक्रम  सुरू केला. 1981 मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा केला गेला होता. त्यानंतर हा दिवस दरवर्षी जगभरात 150 शहरांमध्ये साजरा केला जातो. उपासमारी पिडीतांना मदत करणे तसेच अन्नाचे महत्व सर्वांना सांगणे हे उद्देश जागतिक अन्न दिनाचे आहेत. 



महत्त्वाच्या घटना:
1775 : ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.
 
1905 : भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.


1956 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरमध्ये जवळपास 3 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.


1968 : हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान


1973 : हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


1975 : बांगला देशातील रहिमा बानू ही 2 वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.
 
1984 : नोबेल शांति पुरस्काराने आर्चबिशप डेसमंड टुटू यांना सन्मानित करण्यात आले.


1986 : रिइनॉल्ड मेस्नर हे  8000 मीटर पेक्षा उच्च असणारी 14 शिखरे सर करणारे पहिली व्यक्ती ठरले.