मुंबई : दारूच्या नशेत विमान चालवायला निघालेल्या दोन वैमानिकांवर एअर इंडियाने कारवाई केली आहे. एअर इंडियाचे दोन सिनियर वैमानिक वेगवेगळ्या दोन विमानांना घेऊन उडण्याच्या तयारीत होते. दिल्ली ते लंडन विमानाचा पायलट दोन वेळा अल्कोहोल पॉझिटिव्ह आढळला तर दिल्ली ते बँकॉक विमान घेऊन निघालेल्या सहचालकाने अल्कोहोल टेस्टच केली नाही. दोन्ही प्रकरणातील वैमानिकांवर एअर इंडियाने कारवाई केली आहे.


पहिल्या घटनेत एअर इंडियाचे डायरेक्टर आणि चीफ ऑफ ऑपरेशंस कॅप्टन अरविंद कठपालिया यांच्यावर कारवाई केली आहे. कठपालिया AI-111 विमान दिल्लीहून लंडनला घेऊन जाणार होते. मात्र त्याआधी झालेल्या ब्रीथ अॅनालायझर (अल्कोहोल) टेस्टमध्ये ते फेल झाले. त्यामुळे त्यांना विमान उडविण्यापासून रोखण्यात आले. त्यांच्याजागी दुसऱ्या वैमानिकाला बोलावून 55 मिनिटे उशिराने विमान टेक ऑफ झाले.

कॅप्टन कठपालिया यांना यापूर्वीही 2017 मध्ये याच आरोपावरून पकडण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे फ्लाईंग लायसन्स 3 महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कार्यकारी अधिकारी (ऑपरेशंस) पदावरून देखील हटविण्यात आले होते. मात्र पुन्हा त्यांना एअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पाच वर्षासाठी डायरेक्टर पदावर नियुक्त केले होते.

दुसऱ्या घटनेत एअर इंडियाच्या दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या विमानात सहचालकाने उड्डाण करण्यापूर्वी अल्कोहोल टेस्ट न केल्याने कारवाई करण्यात आली. 200 प्रवाशांना घेऊन निघालेले हे विमान उड्डाण घेतल्यानंतर परत  बोलावले गेले. प्रवाशांना तांत्रिक अडचणींचे कारण सांगितले गेले. वैमानिकाच्या चुकीमुळे हे विमान 6 तास उशिराने बँकॉकला  रवाना झाले.

वैमानिकांसाठी काय आहेत नियम
- एअरक्राफ्ट नियमांच्या अंतर्गत कलम 24नुसार विमानाचा क्रू मेंबर विमान उडविण्याचा आधी 12 तास दारू पिलेला नसावा.  
- विमानात प्रवेश करण्याआधी कर्मचाऱ्यांना अल्कोहोल टेस्ट आवश्यक असते.
- DGCA च्या  नियमानुसार पहिल्यांदा चूक केल्यानंतर 3 महिने फ्लाईंग लायसन्स रद्द केले जाऊ शकते.  
-  दुसऱ्यांदा चूक केल्यानंतर फ्लाईंग लायसन्स 3 वर्षासाठी रद्द केले जाते.
 - तिसऱ्यांदा पकडल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचे लायसन्स आजीवन रद्द केले जाते.