रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विलासपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदींनी नाव न घेता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाना साधला.

मोदी म्हणाले की, ''ते माझ्याकडे नोटाबंदीचा हिशेब मागत आहेत. परंतु ते विसरले आहेत की, नोटबंदीमुळे त्यांच्या बनावट कंपन्या बंद झाल्या. त्यांचा फसवाफसवीचा खेळ लोकांना समजला. त्यानंतर त्या आई आणि मुलाला जामीन घ्यावा लागाला. आता ते दोघे जामीनावर फिरत आहेत. तेच लोक माझ्याकडे नोटबंदीचा हिशेब मागत आहेत''. नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी जानीनावर सुटले आहेत.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील १८ विधानसभा जागांसाठी आज मतदान झाले. या टप्प्यात विलासपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. तेव्हा ते म्हणाले की छत्तीसगड हे भारतासाठी धान्याचे कोठार आहे. संत कबीरांचे भक्त या राज्यात राहतात.


यावेळी मोदी यांनी नोटबंदीशिवाय नक्षलवाद, विकास आणि काँग्रेसने सादर केलेल्या घोषणापत्राबाबत भाष्य केले. तुम्ही सगळेजण भाजपाने देशात केलेल्या विकासाचे साक्षीदार आहात, परंतु काँग्रेसला मात्र आमच्यावर टीका करण्यातच रस आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.