Tripura Assembly Elections 2023: त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका (Tripura Assembly Elections) होणार आहेत. त्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शनिवारी (11 फेब्रुवारी) त्रिपुराला जाणार आहेत. येथे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. त्रिपुरातील अंबासा आणि गोमती येथे ही निवडणूक सभा होणार आहे. राज्यातील 60 सदस्यीय विधानसभेसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री माणिक साहा, भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी महेश शर्मा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य येथील महाराजा बीर बिक्रम (एमबीबी) विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत करतील. त्यांनी सांगितलं की, मोदी दुपारी 12 च्या सुमारास धलाई जिल्ह्यातील अंबासा येथे पहिल्या सभेला संबोधित करतील. यानंतर दुपारी तीन वाजता गोमती येथील दुसऱ्या सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.
भाजपकडून रॅली आणि प्रचार सभा
भाजपचे अनेक मोठे चेहरे निवडणूक प्रचारासाठी त्रिपुरात हजेरी लावणार आहेत. भाजपकडून प्रचारासाठी रॅली, प्रचार सभांसह वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनीही त्रिपुरामध्ये दोन रॅली आणि रोड शो केला होता. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही येथे जोरदार प्रचार केला आहे. सध्या त्रिपुरात निवडणुकांचे वारे वाहत असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या शिगेला पोहोचले आहे.
16 फेब्रुवारीला निवडणूक
त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला 60 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तिनही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 2 मार्चला एकाच वेळी होणार आहे. भाजपनं 55 विधानसभा जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत, तर उर्वरित पाच जागा त्यांच्या युतीसाठी, इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) साठी सोडल्या आहेत.
भाजपचा निवडणूक जाहीरनामा
भाजपने गुरुवारी (9 फेब्रुवारी) आपला संकल्प पत्र (जाहिरनामा) प्रसिद्ध केला होता. राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी पक्षाकडून अनेक आकर्षक आश्वासनं देण्यात आली होती. निवडणूक जाहीरनाम्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक, महिला, विद्यार्थी, आदिवासी भागांत राहणारे लोक आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :