Success Story : देशातील शेतकऱ्यांसमोर (Farmers) सातत्यानं विविध संकटे येत आहेत. कधी अस्मानी तरी सुलतानी संकट येत आहेत. या संकटांचा सामना करत अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) वापर करत उत्तम प्रकारची शेती करत आहेत. अशाच प्रकारचे उत्तम नियोजन करत कमी पाण्यात राजस्थानमधील एका शेतकऱ्यानं भरघोस उत्पादन घेतलं आहे. राजस्थानमधील (Rajasthan) दौसा (Dausa) शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिगड्डा गावातील शेतकरी कैलाश चंद बैरवा यांनी आपल्या पाच एकर शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा...
देशातील अनेक भागात शेती करण्यासाठी पाण्याचा अभाव आहे. त्यामुळं शेतीला मोठा फटका बसतो. अशातच शेतीचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. शेतीच्या वाढत्या खर्चासह येणाऱ्या विविध नैसर्गिक संकटामुळं शेतकरी शेती सोडून शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. राजस्थान, बिहार यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी स्थलांतर करत आहेत. परंतु काही शेतकरी सर्व संकटांचा सामना करत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. राजस्थानातील अनेक शेतकरी कमी पाण्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण करत आहेत.
फळबागांच्या शेतीतून भरघोस उत्पन्न
राजस्थानातील तिगड्डा गावातील शेतकरी कैलाश चंद बैरवा यांनी आपल्या बुद्धिमत्तेने भूजल संकटावर मात केली आहे. पारंपारिक पिकांऐवजी त्यांनी फळबागांची शेती केली आहे. त्यांच्या शेतात बोर, डाळिंब आणि लिंबाची बाग आहे. यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच या पिकांसाठी त्यांनी सूक्ष्म सिंचन केलं आहे. तसेच त्यांच्याकडे शेततळे देखील आहे. त्याचबरोबर दोन पोल्ट्री फार्म देखील आहे. यातून ते भरघोस उत्पादन घेत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या मात्र, कैलाश चंद बैरवा यांनी शेती विकली नाही
कैलाश चंद बैरवा यांनी फळबागांसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. पूर्वी त्यांच्या भागात भरपूर पाणी होते. जवळपास सर्वच पारंपरिक पीके शेतात बहरली होती. ते स्वत: आपल्या शेतात मोहरीचे उत्पादन घेत होते. पण हळूहळू भूजल पातळीही कमी होऊ लागली. या चिंतेमुळं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या आणि शहरात गेले. मात्र, कैलासचंद बैरवा यांनी कृषी विभागाशी संपर्क ठेवून शेती सुरू ठेवली. शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांना, कृषी परिसंवादांना उपस्थित राहण्यास सुरुवात केली. कृषी तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कमी पाणी असलेल्या भागात फळबागांची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कैलाश चंद बैरवा यांनी आपल्या शेतात बोर, डाळिंब आणि लिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
शेतीबरोबरच पोल्ट्री फार्म आणि मत्स्यपालनातून अतिरीक्त उत्पन्न
गेल्या 15 वर्षांपासून बोर आणि लिंबाच्या बागांमधून चांगले उत्पन्न मिळत आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची बचत होते आणि चांगले उत्पादन मिळते. एक किलो बोराला बाजारात 40 रुपयांचा दर मिळत आहे. दौसा, बांदीकुई आणि अलवर व्यतिरिक्त हिसार आणि दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये देखील मालाची निर्यात केली जाते. यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे कैलाश चंद बैरवा यांनी सांगितले. त्यांनी शेतातच घर बांधले आहे. यासोबतच दोन पोल्ट्री फार्म असून, त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. शेततळ्यात त्यांनी मत्स्यपालनाचा व्यवसाय देखील सुरु केला आहे. तसेच त्यांच्याकडे काही दुधाळ जनावरे देखील आहे. त्यातून ते पैसे कमवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: