Meghalaya Election 2023 Final Candidates List: 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेघालय विधानसभेच्या (Meghalaya Assembly Elections) 60 जागांसाठी 375 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी एफआर खारकोंगोर यांनी शुक्रवारी (10 फेब्रुवारी) रोजी ही माहिती दिली. राज्यातील (Meghalaya) सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) 57 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर काँग्रेस (Congress) आणि भारतीय जनता पक्षानं (BJP) सर्व 60 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.


युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) चे 47 उमेदवार रिंगणात आहेत, तर VPP आणि HSDP नं अनुक्रमे 18 आणि 11 उमेदवार उभे केले आहेत. सर्वच पक्ष आपापल्या पातळीवर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मेघालय विधानसभा निवडणूक चुरशीची होणार, यात वादच नाही. 


चार उमेदवारांचे अर्ज रद्द


मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. शुक्रवार (10 फेब्रुवारी) पर्यंत निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी एफआर खारकोंगोर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "शुक्रवारी अर्ज घेण्याची अखेरची संधी होती. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर केवळ 375 उमेदवार रिंगणात उरले आहेत." ते म्हणाले की, "नामांकन छाननी दरम्यान, एनपीपीच्या तीन आणि यूडीपीच्या दोन उमेदवारांसह चार उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितलं की, रिंगणात 375 उमेदवारांपैकी 339 पुरुष आणि 36 महिला आहेत.


2 मार्च रोजी मतमोजणी 


मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 27 फेब्रुवारी पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी होती, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 10 फेब्रुवारी होती. दोन मार्च रोजी मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.  भाजपनं गेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये 47 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. पण केवळ दोन जागा जिंकल्या होत्या. त्यांचे उमेदवार सात जागांवर दुसऱ्या आणि 12 जागांवर तिसऱ्या क्रमांकावर होते. 


गेल्या विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती? 


मेघालयच्या गेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. 21 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, पण तो बहुमतासाठी कमी पडला. कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील NPP 19 जागांसह दुसऱ्या स्थानावर होतं. राज्यातील यूडीपीचे सहा सदस्य निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले. तसेच, राज्यातील पीडीएफनं चार जागा जिंकल्या होत्या आणि भाजप, एचएसपीडीपीनं प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीच्या निकालानंतर संगमा यांनी भाजप, यूडीपी, पीडीएफ, एचपीपीडीपी आणि अपक्षांसह युतीचं सरकार स्थापन केलं आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nagaland Election 2023: नागालँड विधानसभा निवडणुकीत 59 जागांसाठी 183 उमेदवारांमध्ये लढत; 'या' ठिकाणी भाजपचा उमेदवार बिनविरोध