नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या नव्या टीममध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेल्या माजी आयएएस अधिकारी आणि केंद्रीय पर्यटन मंत्री के.जे. अल्फोंस यांच्या वादग्रस्त सल्ल्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यापूर्वी आपापल्या देशात बीफ खाऊन यावं, असा वादग्रस्त सल्ला दिला आहे.

ओडिशामध्ये अल्फोंज इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सच्या 33 व्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री के.जे.अल्फोंस आले होते.

त्यावेळी त्यांना अनेक राज्यांमध्ये बीफ बंदी लागू आहे. त्यामुळे याचा देशाच्या पर्यटन उद्योगावर काय परिणाम होत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, अल्फोंस म्हणाले की, ''जे (परदेशी पर्यटक) आपापल्या देशात गोमांस भक्षण करतात. त्यांनी भारतात येण्यापूर्वी गोमांस खाऊन यावं.''

दुसरीकडे पर्यटन मंत्रालयाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांनी  गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा दाखला देऊन म्हटलं होतं की, ''ज्याप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या राज्यात बीफ संदर्भात कोणतेही प्रतिबंध लावण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याच प्रमाणे केरळमध्येही असे (बीफ विक्री) सुरु राहिल.''

त्यामुळे पत्रकारांनी त्यांना पूर्वीच्या या वक्तव्याची आठवण करुन दिले तेव्हा अल्फोंस यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ''मी एक पर्यटन मंत्री आहे. अन्न आणि पुरवठा मंत्री नाही. तेव्हा यासंदर्भातील निर्णय मी घेऊ शकत नाही.''

दरम्यान, पर्यटन मंत्रालयाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अल्फोंस म्हणाले होते की, ''आपलं खातं देशातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी, विविध नव्या संकल्पनांवर काम करेल. यासाठी देशवासियांनाही आम्ही यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. एका महिन्याच्या आत आम्ही यातील निवडक संकल्पनांवर काम करण्यास सुरुवात करु.''