नवी दिल्ली : वर्षभर उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील दहा पोलिस स्थानकांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस स्टेशन यादीत अव्वल असून महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाला टॉप 10 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही.


पहिल्या स्थानावर राजस्थानमधील कालू बिकानेर, दुसऱ्या क्रमांकावर अंदमान निकोबरमधील कॅम्पबेल बे, तर  तिसऱ्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील फरक्का पोलिस स्टेशनचं नाव घोषित करण्यात आलं आहे.

गुजरातमध्ये सुरु असलेल्या डीजीपी-आयजीपी कॉन्फरन्सला 20 डिसेंबरपासून सुरुवात झाली. यावेळी गृह मंत्रालयाकडून  2018 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या देशभरातील  दहा पोलिस स्थानकांचा गौरव करण्यात आला. गृहमंत्री राजनाथ सिंह याच्या हस्ते या तिन्ही पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आलं.

खेदाची बाब म्हणजे उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या दहा पोलिस स्टेशन्सच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाचा समावेश नाही. खरं तर महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची तत्परताही ट्विटरवर पाहायला मिळते, मात्र प्रत्यक्षात त्यांची कामगिरी टॉप 10 ला साजेशी नसल्याचं म्हणावं लागेल.

उत्तम कामगिरी बजावणाऱ्या दहा पोलीस स्टेशनची यादी

1. कालू (बिकानेर, राजस्थान)
2. कॅम्पबेल बे (अंदमान-निकोबार)
3. फरक्का (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल)
4.  नेत्तापक्कम (पुदुच्चेरी)
5. गुदेरी (कर्नाटक)
6. चोपाल (हिमाचल प्रदेश)
7. लाखेरी - (राजस्थान)
8. पेरियाकुलम (तामिळनाडू)
9. मुन्स्यारी (उत्तराखंड)
10. कुडचरे (गोवा)