मुंबई : जर तुम्ही जुनं मॅगस्ट्राईप डेबिट (एटीएम) किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला ते तातडीने बदलून घ्यावं लागणार आहे. जुनी मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट आणि क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरला बंद होणार असून ग्राहकांना ते बदलून घेण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.


जुनी कार्ड बदलण्याची प्रक्रिया 31 डिसेंबरपूर्वीच करण्यात यावी, असं सांगण्यात आलं आहे. यानंतर मॅग्नेटिक स्ट्राइप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात येतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 27 ऑगस्ट 2015 रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.

सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांचे मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट आणि क्रेडिट कार्ड बदलून ईएमव्ही (EMV) म्हणजेच युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा चिप बेस्ड कार्ड द्यावे, असं सांगण्यात आलं होतं. अद्याप जर तुम्ही ईएमव्ही चिप बेस्ड कार्डसाठी अर्ज केला नसेल, तर 31 डिसेंबरपूर्वी करणं अनिवार्य आहे.

मुदतीपूर्वी आपलं जुनं मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून घेतलं नाही, तर ग्राहकांना त्यांचे एटीएम व्यवहार करता येणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे ईएमव्ही बेस्ड कार्डसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.