नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर टोलनाक्यांवर पुन्हा एकदा टोलवसुली सुरु झाली आहे. सुट्ट्या पैशांच्या तुटवड्यामुळे प्रत्येक टोलनाक्यावर लांबच लांब रांगा लागत आहेत. टोलनाक्यांमुळे देशाचं वर्षाला 1 लाख 45 हजार कोटींचं नुकसान होतं, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.
3 डिसेंबरला टोलवसुली सुरु होताच सुसाट धावणाऱ्या गाड्यांचा वेग मंदावला. टोलनाक्यावरील परिस्थितीमुळे प्रवाशांना तासंतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागतं. सध्या देशभरातील जवळपास 400 टोलनाक्यांवर ही वाहतूक कोंडीची समस्या आहे.
वर्षाला देशाचं 1 लाख 45 हजार कोटींचं नुकसान
वाहतूक कोंडीत वाहने तासंतास अडकल्याने जे नुकसान होतं त्याचे आकडे धक्कादायक आहेत. टोलवर उभ्या राहणाऱ्या गाड्यांमुळे देशाचं वर्षाला 1 लाख कोटींचं इंधन वाया जातं, असा अहवाल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि आयआयएम कोलकाता यांनी दिला आहे.
तर प्रवासी वेळेवर न पोहचल्याने 45 हजार कोटी रुपयांचं नुकसान होतं. म्हणजेच एकूण 1 लाख 45 हजार कोटी रुपयांची आर्थिक झळ देशाला वर्षाकाठी सोसावी लागत आहे.
इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती
निती आयोगाने टोलवरील ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. भारतात चेक पोस्टवर ट्रकला दररोज जवळपास 70 मिनिट उभं रहावं लागतं. तर इतर देशांमध्ये हा सरासरी आकडा केवळ पाच मिनिट आहे. म्हणजेच महामार्गावर भारतात ट्रकला इतर देशांच्या तुलनेत 65 मिनिटे अधिक उभं रहावं लागतं.
भारतात एक मालवाहू ट्रक दिवसात सरासरी 300 किमीचं अंतर कापते. तर इतर देशांमध्ये ही सरासरी 800 किमी प्रति दिन आहे. म्हणजेच टोल नाक्यांवर वारंवार उभं राहवं लागल्यामुळे भारतातील वाहनं 500 किमी कमी चालतात.
निती आयोगाने सुचवलेले उपाय
टोलवर मॅन्युअल पद्धतीने वसुली असल्याने वाहनांची मोठी रांग लागते. मात्र निती आयोगाने यावर काह उपाय सुचवले आहेत. निती आयोगाने वाहनांमध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन म्हणजेच आरएफआयडी लावण्याचा सल्ला दिला आहे.
आरएफआयडीच्या प्रीपेड अकाऊंटद्वारे टोलचं शुल्क डेबिट केलं जाईल. त्यामुळे वाहनांना रांगेत थांबण्याच्या त्रासातून सुटका होण्यासोबतच दीड लाख कोटींचा फायदा देखील करता येईल.