अहमदाबाद : 13 हजार कोटींची बेहिशेबी संपत्ती घोषित करणाऱ्या प्रॉपर्टी डीलर महेश शाह यांना आयकर विभागाने अखेर ताब्यात घेतले आहे. 13 हजार 860 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती घोषित करुन महेश शाह फरार झाले होते.


सरकारच्या इन्कम डिस्क्लोजर स्कीमअंतर्गत आयकर विभागाला 67 वर्षीय महेश शाहांनी त्यांच्याकडील काळ्या पैशांची माहिती दिली आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. महेश शाहांचा जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता, अशी माहिती त्यांच्या सीएने दिली आहे.

6,237 कोटी रुपये टॅक्स म्हणून द्यायचे

महेश शाहांनी 13,860 कोटी रुपयांच्या काळ्या पैशांचा खुलासा केला आहे. इन्कम डिस्क्लोजर स्कीम अंतर्गत त्यांना 45% रक्कम टॅक्स म्हणून द्यायची आहे. याप्रमाणे त्यांना एकूण 6237 कोटी रुपये टॅक्स द्यायचा आहे. स्कीमअंतर्गत पहिला हफ्ता 1560 कोटी रुपयांचा आहे.

महेश शाहांच्या घरासह कार्यालयावर छापा

एक सामान्य घरात राहणाऱ्या महेश शाहांना चार हफ्त्यांमध्ये 45 टक्के टॅक्स भरायचा होता. महेश शाहांना 30 नोव्हेंबरला टॅक्स म्हणून 25 टक्के म्हणजेच 1560 कोटी रुपये जमा करायचे होते. पण मुदत संपल्याने आयकर विभागाने 28 नोव्हेंबरलाच संपूर्ण डिस्क्लोजर रद्द करुन, 29 आणि 30 नोव्हेंबरला महेश शाह आणि त्याचा सीए तेहमूल सेठनाच्या जागांवर छापा टाकला. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महेश शाहांच्या घर आणि कार्यालयांसह, चार्टर्ड अकाऊंट फर्म ‘अप्पाजी अमीन’ वरही छापा टाकला आहे.