राजकोट : गुजरातच्या बोटाडमध्ये 21 वर्षीय बीएडच्या विद्यार्थिनीचा विहिरीत अपघात झाला. पण अपघातानंतर तिने सांगितलेली कारणं ऐकून पोलिसही हैराण झाले.
सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगू लागली. दलित अत्याचाराचा आरोप करत या घटनेशीसंबंधित पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. पण पोलिस तपासात या घटनेमागची खरी कहाणी वेगळीच असल्याचं समोर आलं.
खरंतर तरुणीने प्रियकराला वाचवण्यासाठी अपघात आणि अपहरणाच्या दोन खोट्या कहाण्या रचल्या. तिचा प्रियकर तिच्याच गावातील असून ड्रील मशीन चालवण्याचं काम करतो.
काय आहे प्रकरण?
मांदवधर गावातील विलास वाघेला नावाच्या या तरुणीला अहमदाबादच्या व्हीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिचा अंगठा आणि कान कापला आहे. तर कवटीच्या काही भागालाही दुखापत झाली आहे.
विलासला सुरुवातीला भावनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिची गंभीर अवस्था पाहून तिला अहमदाबादच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. माझा रस्त्यावर अपघात झाला असं विलासने आपत्तकालीन सेवा 108 चं पथक आणि भावनगरच्या डॉक्टरांना सांगितलं. तर अहमदाबादच्या व्हीएस हॉस्पिटलमध्ये अपहरणाची खोटी कहाणी रचली.
खरी कहाणी काय?
"पण खरं गोष्ट अशी होती की, विलास बुधवारी तिचा प्रियकर योगेश वाघेलासोबत गावातील एका विहिरीत गेली होती. योगेश विहीर खोदण्यासाठी ड्रील मशीन चालवण्याचं काम करतो. विलासला ही ड्रील मशीन पाहायची होती. त्यामुळे ती विहिरीत गेली होती. पण यावेळी जोरदार वाऱ्यामुळे तिचे केस ड्रीलिंग मशिनच्या चालत्या बेल्टचा कचाट्यात सापडले. तिने आपल्या हातांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तिचा अंगठा कापला. तिच्या कानालाही गंभीर दुखपात झाली," असं बोटादच्या एसपी साजन सिंह परमार यांनी सांगितलं.
परमार म्हणाले की, "योगेशने 108 या आपत्कालीन सेवेवर फोन केला होता आणि विलासला बाईकवर बसवून रुग्णालयात घेऊन गेला. रस्त्यावर अपघात झाल्याचं सांग. नाहीतर माझ्या कुटुंबीयांना दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत समजेल, असं विलासने योगेशला सांगितलं."
तर व्हीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर विलासने सांगितलं की, "कॉलेजला जाताना कारमधील चार लोकांनी माझं अपहरण केलं. त्यांनी माझी सोन्याची चैन लुटून मारहाणही केली."
विलासच्या या दाव्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र 108 सेवा आणि डॉक्टरांनी हा अपघात असल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी योगेशला बोलावून चौकशी केली असता, खरी कहाणी समोर आली.
दरम्यान, विलासला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं व्हीएस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं.