नवी दिल्ली : हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बॉटल एमआरपीपेक्षा जास्त दराने विकू शकतात, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. आधीच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका सरकारने दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली होती. मात्र मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलला.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी जागा दिली जाते, यासाठी मालकाने खर्च केलेला असतो. त्यामुळे त्यांनी एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलची विक्री केली तर आम्ही ते रोखू शकत नाही, असं न्यायालयाने निकालात म्हटलं होतं.

हॉटेल, रेस्टॉरंट MRP पेक्षा जास्त दराने मिनरल वॉटर विकू शकतात : सुप्रीम कोर्ट


“सरकारने दाखल केलेल्या याचिकेत अशी कोणतीही गोष्ट नाही, ज्याच्या आधारावर आम्ही आमच्या डिसेंबरमधील निर्णयात काही बदल करावेत,” असं न्यायमूर्ती एफ नरिमन आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने सांगितलं.

“फेरविचार याचिका आणि न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी कागदपत्रे लक्षपूर्वक वाचले. आम्ही आमच्या जुन्या निर्णयाने समाधानी आहोत,” असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

“एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याची बॉटल विकणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही,” असंही न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केलं.