नवी दिल्ली:  राज्यसभेच्या 26 जागांसाठी आज मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगाणा आणि केरळ या 7 राज्यात सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानला सुरुवात होत आहे.


राज्यसभेसाठी एकूण 59 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 33 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यामुळे आता 26 जागांसाठी मतदान होत आहे.

महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक होती. ती बिनविरोध झाली आहे.

महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून जात आहेत.

कोणत्या राज्यात काय परिस्थिती? राज्यसभेचं संपूर्ण गणित


आज होणाऱ्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 10, पश्चिम बंगालमधील 5, कर्नाटकच्या 4, तेलंगणाच्या 3, झारखंडच्या दोन छत्तीसगड आणि केरळमधून प्रत्येकी एका जागासाठी मतदान होईल.

दुपारी चार वाजेपर्यंत आमदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

या राज्यांमध्ये बिनविरोध निवडणूक

महाराष्ट्र : भाजपच्या विजया रहाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी बिनविरोध निवड झाली. भाजप तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक-एक उमेदवार निवडून आला. भाजपचे प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांची निवड झाली. तर शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर निवडून गेले.

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशात तीन जागांसाठी निवडणूक होती. तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ज्यामध्ये दोन टीडीपी आणि एक वायएसआरचा उमेदवार आहे.

बिहार : इथे सहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. दोन जेडीयू, एक भाजप, दोन आरजेडी आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला.

छत्तीसगड : इथे एका जागेसाठी निवडणूक होती. भाजपचे सरोज पांडे बिनविरोध निवडून आले.

गुजरात : गुजरातमध्ये चार जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. यामध्ये दोन काँग्रेसचे, तर दोन भाजपचे खासदार आहेत.

हरियाणा : इथेही भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली.

हिमाचल प्रदेश : इथे एकाच जागेसाठी निवडणूक होती आणि जेपी नड्डा यांची बिनविरोध निवड झाली.

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होती. यामध्ये केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याशिवाय तीन इतर उमेदवार अजय प्रताप सिंह, कैलाश सोनी आणि राजमणी पटेल यांची बिनविरोध निवड झाली.

राजस्थान : इथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे भूपेंद्र यादव, मदनलाल सैनी आणि डॉक्टर किरोडी लाल यांची बिनविरोध निवड झाली.

देहरादून : उत्तराखंडमधील एका जागेवरही बिनविरोध निवडणूक झाली. भाजपचे अनिल बलूनी खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले.

ओदिशा : इथे तीन जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. बीजेडीचे तीन उमेदवार निवडून आले.