नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटांवर लक्ष्मीदेवीचा फोटो छापावा, असा अजब सल्ला भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. इंडोनेशियातील नोटांवर गणपतीचे फोटो असल्याच्या प्रश्नावर बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं की, भारतीय नोटांवरही लक्ष्मीचा फोटो असायला हवा. गणपती विघ्नहर्ता आहे, मात्र आज भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीदेवीचा फोटो नोटेवर असणे गरजेचं आहे. यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचीही गरज नाही. मात्र नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापण्याबद्दलचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. देशाची अर्थव्यवस्था गेल्या 42 वर्षात एवढी खालावली नव्हती. जीडीपी दर 2019-20 मध्ये 7 टक्क्यांवर राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सहा महिन्यानंतर जीडीपी वाढीचा दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आला, तो 11 वर्षाचा नीचांकी आहे.
मध्य प्रदेशच्या खंडवा येथे स्वामी विवेकानंद यांच्यावरील तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारतातील वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय नसून, लोकसंख्येचा उत्पादकता म्हणून वापर करण्यासाठी लोकांना शिक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए एकच आहे, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं.
हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए एकच आहे. दोघांचे वंशजही एकच आहेत, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं. आपले वंशज एकच असल्याचं इंडोनेशियाचे मुस्लीम मान्य करतात, मात्र भारतातील मुस्लीम ते मान्य करत नाहीत. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी इंडोनेशियात नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आल्याचा दाखला दिला.