Uttarakhand Election Result 2022 : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पंजाब वगळता चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. उत्तराखंडमध्येही पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकला आहे. भाजपने 70 पैकी 47 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर 19 जागांसह काँग्रेस आहे. उत्तराखंडमध्ये लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल. पण मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शिगेला लागली आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाल्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाजप मुख्यमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. पण काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, भाजप पुन्हा एकदा पुष्कर सिंह धामी यांना पुन्हा संधी मिळू शकते. नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखली आहे. पण मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कर सिंह धामी यांच्याशिवाय धन सिंह रावत आणि सतपाल महाराज मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
दरम्यान, उत्तराखंड भाजपचे प्रभारी प्रल्हाद जोशी हे पुष्कर धामी पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहेत. तर काही दिग्गज नेत्यांचा याला विरोध आहे. त्यामुळे पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदाची निवड करण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांना उत्तरखंडामध्ये पाठवण्यात येणार आहे. हे दोन्ही मंत्री राज्यातील आमदारांची बैठक घेऊन समिक्षा करणार आहेत.
2017 मध्ये भाजपला होतं बहुमत -
उत्तराखंडमध्ये 2017 विधानसभा निवडणूकीच्या वेळी भाजपला बहुमत मिळालं होतं. भाजपने तब्बल 56 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसला मात्र 11 जागाच मिळवण्यात यश आलं होतं. तर तीन जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या होत्या. उत्तराखंडमध्ये 2017 साली 65.56 टक्के मतदान झालं होतं तर यंदा मात्र 65.37 टक्के मतदानाची टक्केवारी आहे. उत्तरखंडमध्ये सत्तास्थापन करत भाजपने इतिहास रचला आहे. कारण, उत्तराखंडमध्ये लागोपाठ दोन वेळा कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता आलेली नव्हती. भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल आहे.