Election Results 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. निवडणुका झालेल्या पाच राज्यापैकी एकमेव पंजाब हे राज्य काँग्रेसच्या ताब्यात होते. मात्र, तिथेही काँग्रेसला हादरा देत आम आदमी पार्टीने जोरदार धक्का दिला आहे. बाकीच्या राज्यातही काँग्रेसला म्हणावं तसे यश संपादन करत आले नाही. दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील जी-23 (G-23) नेत्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत पाच राज्यात लागलेल्या निकालांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काँग्रेस नेतृत्व बदलाची मागणीवरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या G-23 नेत्यांनी बोलावलेल्या बैठकीला विविध नेते उपस्थित होते. काँग्रेसच्या G-23 नेत्यांच्या गटात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी आणि भूपिंदर सिंग हुडा यांचा समावेश आहे. गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यामुळे काँग्रेसचे नेतृत्व बदलाची मागणी पुन्हा जोर धरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीला उपस्थित राहणारे G23 गटाचे नेते लवकरच संघटना आणि नेतृत्व बदलाची मागणी पुन्हा एकदा मांडतील, असा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, G-23 चे नेते घाईने कोणतेही पाऊल उचलणार नाहीत. तथापी, बैठकीनंतर, G-23 च्या सूत्रांनी स्पष्टपणे सांगितले की, यापुढे असे चालू शकत नाही. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. येत्या काही दिवसांत G-23 नेत्यांमध्ये आणखी बैठका होण्याची शक्यता देखील आहे.
काँग्रेसच्या G-23 गटात समाविष्ट असलेल्या नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसमधील सक्रिय अध्यक्ष आणि संघटनेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर G-23 गटाच्या नेत्यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव दुर्दैवी असल्याचे सांगून काँग्रेस लवकरच जनतेचा विश्वास जिंकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खर्गे यांनी ट्विट केले की, माझ्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहणे दुर्दैवी होते. परंतू, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की केवळ आपणच फॅसिस्ट शक्तींशी लढू शकतो. आम्ही लवकरच जनतेचा विश्वास पुन्हा जिंकू असे खर्गे यांनी म्हटले आहे.