नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर ज्यांच्यावर कारवाई केली जातेय त्यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना मारला आहे. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. 


भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढा सुरूच राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, "केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा पुकारला आहे. राजकारणाच्या आडून अनेकांनी पैसा कमावला. अशा लोकांवर आता कारवाई केली जात आहे. ज्यांच्यावर कारवाई केली जाते त्यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केले जातात. पण लोकांचा केंद्र सरकारवर विश्वास आहे. मोदी सरकार देशातील भ्रष्टाचार संपवणार असा त्यांना विश्वास आहे. लोकांचा विश्वास असल्याने केंद्र सरकार भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरूच ठेवणार."


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना टोला असल्याचं सांगण्यात येतंय. 


गरिबांना त्यांचा हक्क मिळावा हा भाजपचा ध्यास
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जनतेचा विश्वास संपादन करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती. होळी 10 मार्च पासून सुरू होईल हे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले. या साठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. गरीबांना त्यांचा हक्क मिळावा हा भाजपचा ध्यास आहे. आजच्या निकालाने जनेतने भारताच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. गरीबांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी भाजप प्रयत्न  करते. जोपर्यंत गरीबांना त्यांचा हक्क मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.  प्रत्येक गरीबापर्यंत  सरकारी योजना  पोहचवण्यासाठी काम करणार आहे. भाजप प्रत्येक गरीबापर्यंत पोहचणार आहे. 


संबंधित बातमी: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha