Tirupathi Temple Net Worth : देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर ( Tirupati Balaji Temple ). तिरुपती देवस्थान तिरुपती देवस्थानाची ( Tirumala Tirupati Devasthanam ) संपत्ती गेल्या तीन वर्षांमध्ये वाढली आहे. तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक येत असतात. त्यामुळे मंदिराला सोने-चांदी, रोख अशा विविध प्रकारांनी देणगी दिली जाते. तिरुपती मंदिराला मिळणारं दान अधिक आहे, त्यामुळे हे देवस्थान देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असून याच्या संपत्तीचा विषय अनेकदा चर्चेत असतो. आता तिरुमला तिरुपती देवस्थान समितीने ( Tirumala Tirupati Devasthanams ) देवस्थानाकडे असणारी एकूण संपत्ती आणि मालमत्ता याबाबत शनिवार परिपत्रक जारी केलं आहे.


देशातील दिग्गज कंपन्यांच्या मालमत्तेपेक्षाही मंदिराची संपत्ती अधिक


आंध्र प्रदेशातील ( Andhra Pradesh ) व्यंकटेश मंदिर ( Lord Venkateswara ) तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजेच तिरुपती मंदिर भारताती श्रीमंत देवस्थानांपैंकी एक आहे. सध्या तिरुपती देवस्थानाकडे एकूण 2.5 लाख कोटी संपत्ती आहे. मंदिर समितीने नव्याने जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. मंदिराची ही संपत्ती देशातील दिग्गज कंपन्यांच्या मालमत्तेपेक्षाही अधिक आहे. विप्रो,  नेस्ले आणि ओएनजीसी ( ONGC ) आणि इंडियन ऑइल (IOC) या कंपन्यांपेक्षाही ही तिरुपतीची संपत्ती जास्त आहे. 


मंदिर समितीनेकडून पहिल्यांदाच मालमत्तेचा खुलासा


तिरुमला तिरुपती देवस्थानाची (TTD) स्थापना 1933 साली झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच मंदिर समितीने एकूण संपत्तीची माहिती जाहीर केली आहे.
ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे की, समितीकडे 10.25 टन सोनं आणि 2.5 टन सोन्याचे दागिने यांसाह 16,000 कोटी रुपये विविध बँकांमध्ये जमा आहेत. संपूर्ण भारतात तिरुपती देवस्थानाच्या मालकीच्या 960 मालमत्ता आहेत. मंदिराच्या स्थापनेनंतर ट्रस्टने मालमत्तेबाबत पहिल्यांदाच खुलासा केला आहे.


तिरुपती देवस्थानाकडे 2.5 लाख कोटींची मालमत्ता


तिरुपती देवस्थानाच्या वतीने मंदिराच्या मालमत्तेची घोषणा केली. यानुसार, सध्याच्या विश्वस्त मंडळाने 2019 पासून आपली गुंतवणूक आणि मार्गदर्शक तत्त्वे मजबूत केली आहेत. अतिरिक्त रक्कम शेड्युल्ड बँकांमध्ये गुंतवली जाते. मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानाची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी रुपये आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये त्यांच्याकडे 5,300 कोटींहून अधिक रक्कम तसेच 10.3 टन सोन्याच्या ठेवी जमा आहेत. याशिवाय देवस्थानाकडे 15,938 कोटी रुपये  रोकड जमा केलेली आहे.