Coronavirus Symptoms : जगभरात सुमारे दोन वर्षांपासून अधिक काळ कोरोनाचा ( Coronavirus ) कहर पाहायला मिळत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असला तरी धोका कमी झालेला नाही. कोविड19 विषाणूमध्ये काळानुसार अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोनाचे नवीन व्हेरियंट आढळून आले, त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढला होता. दरम्यान, एका नव्या अभ्यासात समोर आलं आहे की, कोविडची लक्षणे ( Covid19 Symptoms ) देखील काळानुसार बदलत आहेत. काळानुसार कोरोना विषाणूची धोका कमी झालेला असला, तरी हा धोका पूर्णपणे टळला नसून कोविड19 विषाणूच्या लक्षणांमध्येही बदल झाल्याचं एका अभ्यासात आढळलं आहे.
भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जास्त कहर पाहायला मिळाला होता. ज्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या डेल्टा ( Delta ) आणि ओमायक्रॉन ( Omicron ) व्हेरियंट वेगाने पसरला होता. मात्र, यानंतर कोरोना आजारांनी सौम्य वळण घेतले. कोरोना लसीचाही त्यावर मोठा परिणाम झाला, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली. अलिकडेच झालेल्या एका अभ्यासात कोरोनाची कोणती लक्षणे बदलली आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
चव नसणे किंवा गंध न येणे हे कोरोनाचं प्रमुख लक्षण नाही
इंग्लंडमधील एका अभ्यासात नवीन माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये 17,500 कोरोना रुग्णांवर एक अभ्यास केला गेला. यामध्ये आढळून आलं आहे की, तोंडाला चव नसणे किंवा गंध न येणे ही कोरोनाची प्रमुख लक्षणं नाहीत. याव्यतिरिक्त, अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्यांमध्ये प्रामुख्याने चव नसणे किंवा गंध न येणे ही लक्षणं आढळली होती. तुलनेनं ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप येणे आणि श्वासोच्छवास करण्यात अडथळा येणे ही लक्षणं आढळली होती.
सध्या कोविडची लक्षणे काय आहेत?
झो हेल्थ स्टडीनुसार, घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक बंद होणे, सतत खोकला आणि डोकेदुखी ही सध्या कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. अभ्यासात असेही आढळून आले आहे की, कोविड-19 ची नवीन लक्षणे जुन्या लक्षणांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. आधी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये जसे की सतत खोकला, वास न येणे, ताप आणि श्वास करण्यात अडथळे ही लक्षणं आढळली होती, मात्र आता यामध्ये बदल झाला आहे.
अभ्यासात काय समोर आलं?
इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासात 1 जून ते 27 नोव्हेंबर 2021 (जेव्हा डेल्टा व्हेरिएंटचा कहर शिखरावर होता) आणि 20 डिसेंबर 2021 आणि 17 जानेवारी 2022 (जेव्हा ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिखरावर होता) या काळात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा समावेश होता. या अभ्यासासाठी एकूण 62,002 पॉझिटिव्ह नमुने गोळा करण्यात आले आणि त्या रुग्णामधील लक्षणांचा अभ्यास करण्यात आला. याशिवाय, अभ्यासात असंही समोर आलं आहे की, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंटचा खालच्या श्वसनमार्गावर परिणाम होण्याची शक्यता नाही, जिथे विषाणूमुळे जास्त नुकसान होते असं म्हटलं जात होतं.
अप्पर रेस्पीरेटरी इन्फेक्शन आणि लोअर रेस्पीरेटरी इन्फेक्शन
कोविड रूग्णांनी अनुभवलेल्या लक्षणांमध्ये का बदल झाला आहे याचे उत्तर शास्त्रज्ञांना अद्याप सापडलेलं नाही. अनेकांनी याबाबत वेगवेगळं मत व्यक्त केलं आहे. खालच्या श्वसनमार्गावर हल्ला करणाऱ्या डेल्टा प्रकाराच्या तुलनेत, ओमायक्रॉन व्हेरियंट वरच्या श्वसनमार्गावर हल्ला करतो. म्हणूनच डेल्टाची लागण झालेल्या लोकांमध्ये न्यूमोनियासारखी गंभीर लक्षणे आढळतात, तर ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये अनेकदा सामान्य सर्दीसारखी लक्षणे दिसतात, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.