Cyclone Tauktae : तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर विध्वंसक तोक्ते चक्रवादळ सोमवारी (17 मे) रोजी रात्रीच्या सुमारास गुजरातच्या समुद्रकिनारी धडकलं. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग ताशी 185 किलोमीटर इतका नोंदवला गेला. गुजरात किनाऱ्यावर दीव ते महुवादरम्यान तोक्ते चक्रीवादळाचा लँडफॉल सुरु झाला. ज्यानंतर 12 तासांच्या कालावधीत चक्रीवादळाची तीव्रता ही टप्प्याटप्प्यानं कमी होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळ जमिनीला धडकलं ती संपूर्ण प्रक्रिया सुमारे दोन तासांसाठी चालली. चक्रीवादळाची तीव्रता किंबहुना केंद्रच अगदी जवळ असल्यामुळं गुजरातमध्ये यामुळं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. चक्रीवादळामुळे येथील अनेक भागांत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
चक्रीवादळाच्या संकटाची तीव्रता पाहता सुरक्षेचे उपाय म्हणून गुजरातमध्ये जवळपास दीड लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. याशिवाय एनडीआरएफ आणि एसडीआरएफची तब्बल 54 पथकं इथं मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.
वादळ सरल्यानंतरही परिणाम कायम
कोकण आणि मुंबईच्या किनाऱ्यांपासून हे वादळ बरंच पुढे गेलं असलं तरीही वादळाचे परिणाम मात्र अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. कोकणातील बहुतांश भाग अद्यापही ढगाळलेला आहे तर काही भागांत पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. मुंबई, रायगड, ठाणे, पालघर या भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी सुरुच आहेत. तर, नवी मुंबई आणि पश्चिम उनगरांमध्येही असंच काहीसं चित्र दिसत आहे. त्यामुळं तोक्ते सरलं असलं तरीही त्याचे परिणाम मात्र अद्यापही दिसत आहेत असंच म्हणावं लागेल.