अहमदाबाद : तोक्ते चक्रवादळ सोमवारी (17 मे) रात्री गुजरातच्या समुद्रकिनारी धडकलं. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग ताशी 185 किलोमीटर होता. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची प्रक्रिया सुमारे दोन तास चालली. चक्रीवादळामुळे गुजरातच्या अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या. वादळ धकल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊसही बरसत आहे. 






चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळ हलवण्यात आलं. याशिवाय एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 54 पथकं मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. तर पोरबंदरमधील सदर रुग्णालयाच्या आयसीयूमधून जवळपास ऑक्सिजनवर असलेल्या 17 कोरोनाबाधित रुग्णांना खबरदारी म्हणून इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं होतं. 


मागील 23 वर्षांत गुजरातमधील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळ हे गुजरातमध्ये मागील 23 वर्षात धडक देणारं सर्वात शक्तिशाली वादळ आहे. चक्रीवादळामुळे दोन मोठ्या जहाजांमध्ये 410 जण अडकले असून त्यांना नौदलाच्या तीन जहाजांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.


महाराष्ट्राला तडाखा
दरम्यान गुजरातला पोहोचण्याआधी तोक्ते वादळाने महाराष्ट्रात मोठं नुकसान केलं. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात या चक्रीवादळामुळे सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. याशिवार चार जनावरंही दगावली आहेत. मुंबईसह अनेक भागात अजूनही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसत आहे.


संबंधित बातम्या