मुंबई : बँक ऑफ इंडियासह 9 बँकांवर केलेल्या कारवाईबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. आरबीआयने केलेल्या तातडीच्या सुधारणेच्या कारवाईमुळे (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन) या बँकांच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
बँक ऑफ इंडियासह आयडीबीआय बँक, इंडियन ओवरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनायटेड बँक ऑफ इंडिया, देना बँक, कार्पोरेशन बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे.
या बँकांनी वितरीत केलेली कर्ज संकटात सापडल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या बँकांना नव्याने कर्जे देता येणार नाहीत, तसेच शेअरधारकांना लाभांशाचं वाटपही करता येणार नाही. आरबीआयने या सर्व बँकांना प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शनसाठी (तातडीच्या सुधारणांसाठीची कारवाई) बनवलेल्या यादीत टाकलं आहे.
या पार्श्वभूमीवर या सर्व बँका बंद होणार आहेत, अशा बातम्या सोशल मीडियात पसरल्या होत्या. त्याची दखल घेत रिझर्व्ह बँकेने कारवाईबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या व्हायरल होत असलेल्या बातम्या निव्वळ निराधार असल्याचं आरबीआयने सांगितलं.
प्रॉम्प करेक्टिव्ह अॅक्शन घेतली जात असताना बँकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे पाऊल उचललं जातं. त्याचा ग्राहकांना कोणताही फटका बसणार नाही, असंही आरबीआयने म्हटलं आहे.