गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपने विधानसभेच्या 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवला. गेल्या निवडणुकीत भाजपच्या 115 जागा होत्या, मात्र या निवडणुकीत 99 जागांवर समाधान मानावं लागलं. तीन अंकी आकडाही गाठता न आल्याने भाजपवर विरोधकांनी निशाणा साधला. मात्र आता अपक्षाच्या मदतीने भाजपने 100 चा आकडा पूर्ण केला आहे.


अपक्ष आमदार रतनसिंह राठोड यांनी भाजपला समर्थन देण्यासाठी राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे भाजपला 100 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नसल्या तरी किमान 100 आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करता येईल.

रतनसिंह राठोड कोण आहेत?

या निवडणुकीत रतनसिंह राठोड यांना काँग्रेसने तिकीट दिलं नव्हतं. तिकीट न मिळाल्यानंतर त्यांनी लुनावाडा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. काँग्रेसने रतनसिंह राठोड यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं होतं.

विजय रुपाणी मुख्यमंत्री

पक्षाच्या बैठकीत विचारमंथन झाल्यानंतर पुन्हा एकदा विजय रुपाणी यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची वर्णी लागली आहे. गांधीनगर येथील पक्षाच्या कार्यालयात याबाबत निर्णय झाला.

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला, मात्र काँग्रेस त्यांचा चांगलाच घाम काढला. गुजरातमध्ये 182 पैकी दीडशे जागा जिंकू असं छातीठोकपणे सांगणाऱ्या, भाजप अध्यक्ष अमित शाह यांना शंभर जागांवरच विजय मिळवता आला.

गुजरातमध्ये भाजपला 99, काँग्रेस 77, राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 3 आणि इतर पक्षांनी 2 जागा मिळवल्या.